चारा बंद, छावण्या बंद, फडणवीस सरकार फेकू सरकार! आत्महत्या नाही केली प्रेमाने, अशा घोषणांचे फलक झळकावत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी विधिमंडळाला फे-या घालून फडणवीस सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली.
मुंबई – चारा बंद, छावण्या बंद, फडणवीस सरकार फेकू सरकार! आत्महत्या नाही केली प्रेमाने, अशा घोषणांचे फलक झळकावत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी विधिमंडळाला फे-या घालून फडणवीस सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. दुष्काळग्रस्त शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी व आदर्श मंत्री आचारसंहितेचे उल्लंघन करत संघ परिवाराच्या एका वृत्तपत्राच्या कंपनीत संचालक पदावर कार्यरत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तात्काळ राजीनामा देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर निर्दशने केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फडणवीस सरकारविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी सकाळी सभागृह सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात हजेरी लावली होती. विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हातात निषेधाचे फलक घेतलेल्या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली.
वारंवार मागणी करूनही सरकार दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी काहीही करत नाही म्हणून संतापलेल्या विरोधकांनी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. यावेळी प्रतीकात्मक तिरडीही तयार करण्यात आली होती या तिरडीवर शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा झोपले होते. तर नागपूरचे आमदार प्रकाश गजभिये यांनी हातात मडके पकडले होते. त्यानंतर ही प्रतीकात्मक तिरडी खांद्यावर घेऊन सर्व सदस्यांनी विधिमंडळाला फे-या मारत फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला.
मुख्यमंत्र्यांनी रस्ता बदलला
गुरुवारी विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी एकत्रित जोरदार आंदोलन करत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात येण्याचा रस्त्याच बदलला. आक्रमक झालेले विरोधक आपल्याला घेराव घालतील, अशा चिंतेने घेरलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराने न जाता दुस-या वाटेने आपले दालन गाठले. हे पाहून ‘पळाले बघा, पळाले, मुख्यमंत्री पळाले’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.