तीन दिवसांपूर्वी गोरेगाव फिल्मसिटी येथे श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी आरे सबवे पोलिसांनी तीन जणांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली.
मुंबई – तीन दिवसांपूर्वी गोरेगाव फिल्मसिटी येथे श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी आरे सबवे पोलिसांनी तीन जणांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. योगेश कोकणे, सुमीत तळेकर आणि जुगल दोडिया अशी आरोपींची नावे असून या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपी पसार असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले.
२२ मे रोजी दुपारी आरे कॉलनीतील फिल्मसिटीच्या सुरक्षारक्षकांच्या कचेरीजवळील कालिया मैदानाजवळ शिंदे बसले होते. या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन मारेक-यांनी शिंदे यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडून तिथून पळ काढला होता.
या प्रकरणी आरे सबवे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. पोलिसांचा शोध सुरू असताना दुचाकी सुमीत तळेकर याच्या मालकीची असल्याचे उघडकीस आले. सोमवारी सुमीतला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता हा गोळीबार सूड उगवण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे उघडकीस आले.
पोलीस तपासात एक महिन्यापूर्वी योगेश, राकेश कांबळे, संदीप खैरनार आणि सुरेश गायकवाड शिंदे यांना भेटण्यासाठी फिल्मसिटीमध्ये गेले होते. या चौघांनी शूटिंगसाठी लागणारे सेटचे साहित्य पुरवण्याचे काम मिळावे, यासाठी शिंदे यांच्याकडे विनंती केली मात्र त्यांच्यात काही वाद झाले होते. या वेळी शिंदे यांनी चौघांना मारहाण केली होती.