उरण तालुक्यातील फुंडे गावातील रस्त्याच्या बाजूला सोमवारी सकाळी दोन जिवंत तोफगोळे आढळून आले.
उरण- तालुक्यातील फुंडे गावातील रस्त्याच्या बाजूला सोमवारी सकाळी दोन जिवंत तोफगोळे आढळून आले. यामुळे परिसरात घबराट पसरली असून नागरिकांमधून वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
फुंडे गावाजवळील रस्त्याच्या बाजूस सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास दोन तोफगोळे आढळून आले. याबाबत येथील ग्रामस्थांनी न्हावा-शेवा पोलिस ठाण्यास कळवले. त्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्या ठिकाणी एक तोफगोळा २ फूट लांबीचा तर दुसरा दीड फूट लांबीचा गंजलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे लगेचच नौदल शस्त्रागार व बॉम्बशोधक व नाशकपथकाला बोलावण्यात आले. करंजा नौदलाच्या अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही तोफगोळय़ांचे निरीक्षण केले. हे दोन्ही तोफगोळे वष्रे १९४५ पूर्वीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हे तोफगोळे गंजलेल्या स्थितीत असल्याने ते कोणत्या बनावटीचे आहेत, कोणत्या देशातील आहेत, कोणत्या वर्षातील आहेत, कोठून आले असावेत, हे सांगता येत नाही, असे नौदल शस्त्रागारच्या (एनएडी) अधिका-यांनीही सांगितले.
दरम्यान, दोन्ही तोफगोळे एनएडीच्या अधिका-यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासणीसाठी घेऊन गेली. परंतु हे तोफगोळे भंगारवाला अथवा अन्य व्यक्तीने फोडण्याचा प्रयत्न केला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. हे दोन्ही तोफगोळे एनएडीमधील अधिका-यांनी अॅ्मिनेशन वर्कशॉपमध्ये तपासणीसाठी नेले आहेत. पुढील तपास झाल्यानंतर अहवाल सादर केला जाईल, असेही अधिका-यांनी सांगितले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक बघे व उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदाम औटी उपस्थित होते.