एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपी बाबासाहेब कांबळे (५०) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले.
मुंबई- तीन वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपी बाबासाहेब कांबळे (५०) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरमानी आणि अजय गडकरी यांच्या खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे.
तीन वर्षापूर्वी २८ ऑक्टोबर २०११ रोजी रिक्षाचालक असणा-या बाबासाहेब कांबळे याने घराशेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीला काही कामानिमित्त घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. यावेळी सत्रन्यायालयाने हा खटला दुर्मिळातील दुर्मीळ खटला म्हणून संबोधून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली. या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता.
कांबळे याने केलेले कृत्य माफी देण्यालायक नसून त्याच्यामध्ये सुधारणा होणे शक्य नाही. अशा व्यक्तीस जगण्याचा अधिकार नसून त्याला दिलेल्या शिक्षेमुळे समाजात पुन्हा असे प्रकार न होण्यासाठी एक चांगला संदेश पोहोचला जाईल असे मत न्यायालयाने व्यक्त केले.