मुंबईत पार्किंगसाठी जागा मिळणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे.
मुंबई- मुंबईत पार्किंगसाठी जागा मिळणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. मुंबईतील ५ ते ६ हजार खासगी बसपैकी सुमारे चार ते साडेचार हजार बस रस्त्याच्या बाजूला नियम धाब्यावर बसवून बेकायदा पार्किंगकरीत आहेत. त्यामुळे एकटया मुंबईत दिवसाला बेकायदा पार्किंगमुळे २ लाख २५ हजार रुपयांच्या महसुलाचा भरुदड पालिकेला बसत असल्याचे समोर आले आहे. तर बेकायदा पार्किंगमुळे मुंबईकरांना सक्तीच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहर व उपनगरात असणारी रस्त्यांची लांबी १९५० किमी एवढी आहे. यामध्ये सुमारे ८ लाख कार तर २० लाखांच्या घरात मोटरसायकल आहेत. त्यातच वर्षाला चाळीस हजारांहून अधिक खासगी गाडयांची तर एक लाख मोटरसायकलींची संख्या रस्त्यांवर वाढत आहे. एका दिवसात ३०० ते ४०० नवीन वाहनांची नोंद केली जात आहे. ब-याच ठिकाणी रस्त्यांच्या शेजारी बेकायदा पार्किंगकेली जात असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यावर कडी करत खासगी बसची बेकायदा पार्किंगकरण्यात येते.
पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार व मोटार वाहन कायद्यानुसार एसटी स्थानक असलेल्या २०० मीटर परिसरात अवैध वाहने उभी करणा-यांवर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र खासगी वाहतूकदारांकडून वाहतूक पोलिसांना चिरिमिरी देऊन पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साधारण एक खासगी बस पार्किंगकरण्याकरिता ४०० ते ४५० चौ. फूट जागा लागते. एवढीच जागा मुंबईत विकत घ्यायची झाल्यास यासाठी किमान २५ ते ३० लाख रुपये मोजावे लागतात. मात्र हीच जागा पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मोफत उपलब्ध होत आहे. याचाच फायदा खासगी वाहतूकदार मोठया प्रमाणात घेत आहेत. त्यामुळे पार्किंग प्रश्न भीषण होत असल्याची माहिती जाणकार देतात.
वाहतूक कोंडीची मुख्य ठिकाणे
» दादर टीटी, सीएसटी स्थानकाबाहेर, चेंबूर मैत्री पार्क, बोरिवली नॅशनल पार्क, वाशी ब्रिज, मुंबई सेंट्रल, ठाणे तीन हात नाका.
» दादर हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असल्याने एसटी स्थानक, टॅक्सी स्टँड, सिग्नल, खासगी वाहने रस्त्यांच्या बाजूला उभी केली, तर वाहतुकीचा बो-या वाजतो आणि प्रचंड वाहतूक कोंडी उद्भवते.
» न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी बसवर सामानाची वाहतूक करणे अवैध असूनही कायदा पायदळी तुडवत सीएसटीसारख्या अतिमहत्त्वाच्या परिसरातही वाहतूक करीत आहेत याकडे पोलिसांची मात्र डोळेझाक.
» मुंबई सेंट्रल येथे एसटी मुख्यालयाजवळच खासगी बसचे बस्तान, बोरिवलीमध्येही हीच वाहतूक कोंडी.
» शीव-पनवेल मार्गावरील चेंबूर मैत्री पार्क, वाशी ब्रिजशिवाय ठाण्यातील तीन हात नाका परिसरातही वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.