बेस्टच्या वीज ग्राहकांना योग्य बिल देण्यासाठी प्रशासनाने डाटा बेसवर आतापर्यंत ६० कोटी रुपये खर्च करूनही सर्व्हर डाऊनचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जादा बिलाचा फटका वीज ग्राहकांना सहन करावा लागतो.
मुंबई – बेस्टच्या वीज ग्राहकांना योग्य बिल देण्यासाठी प्रशासनाने डाटा बेसवर आतापर्यंत ६० कोटी रुपये खर्च करूनही सर्व्हर डाऊनचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जादा बिलाचा फटका वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. कोटय़वधी रुपये खर्च करूनही ही यंत्रणा सातत्याने बंद होण्याचे कारण काय, असा प्रश्न बेस्ट समिती सदस्यांनी उपस्थित केला आहे.
बेस्टच्या विद्युत विभागाकडे १० लाख वीज ग्राहक असून आठ लाख निवासी आणि दोन लाख व्यावसायिक ग्राहक आहेत. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे आणि योग्य बिल आकारणे बेस्टची जबाबदारी आहे. ग्राहकांना योग्य बिल देण्यासाठी टीव्हीएस्टार कंपनीला कंत्राट दिले. ही कंपनी बेस्टच्या डाटा बेसच्या माध्यमातून बिल तयार करण्याचे काम करते. ग्राहकांना योग्य बिल मिळण्यासाठी बेस्टने डाटा बेसवर ६० कोटी रुपये खर्च केले. मात्र डाटाबेसचा सव्र्हर डाउन होण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये डाटा बेसचा सव्र्हर डाउन झाल्याने वीज ग्राहकांना जानेवारीत अवाच्या सव्वा बिल आल्याने ग्राहकांनी बेस्टकडे तक्रारी केल्या.
बेस्टचा आयटी विभाग असताना अन्य कंपन्यांकडून सल्ला घेण्याची गरज काय, टीव्हीएस्टार कंपनी शिवाय दुसरा पर्याय बेस्टकडे नाही का, सव्र्हर डाउन झाल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसतो, असा आरोप बेस्ट समिती सदस्य प्रमोद मांद्रेकर यांनी केला. डाटा बेसचा सव्र्हर डाउन होऊ नये, यासाठी नवा पर्याय शोधण्यात येत आहे. डाटा बेसमध्ये गंभीर समस्या असून त्याचा परिणाम देयक व वित्त यावर होतो, असेही ते म्हणाले. डाटा बेस योग्य प्रकारे चालण्यासाठी दीर्घकालीन करार गरजेचे आहे. डाटा बेसबाबत लवकरच धोरण तयार करण्यात येणार आहे. ग्राहकांना जादा बिल आले तरी दोन महिन्याच्या युनिटमध्ये फरक करून बिल आकारले आहे. त्याबाबत बिलात नमूद करण्यात आले. तांत्रिक अडचण दूर करण्यास थोडा वेळ लागतो. परंतु ग्राहकांना सव्र्हर डाउनचा फटका बसणार नाही, याची काळजी घेण्यात येते, असे बेस्ट महाव्यवस्थापक आे. पी. गुप्ता यांनी सांगितले.