सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहकांमधील वाद मिटवण्यासाठी बसवाहकांना किमान १०० रुपयांची चिल्लर देण्याची सुविधा लवकरच करण्यात येणार आहे.
मुंबई- बेस्ट बसवाहकास दररोज २५ रुपयांची चिल्लर देण्यात येते. मात्र अधिकतर प्रवासी १० रुपयांची नोट देत असल्याने प्रवाशांना उर्वरित पैसे देणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासी व बसवाहक या दोघांमध्ये रोज सुट्या पैशांवरून खटके उडतात. सुट्या पैशांवरून होणारा वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येक वाहकासह किमान १०० रुपयांची चिल्लर देण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी सांगितले.
बेस्टच्या ताफ्यात ४,२८६ बस असून, दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याबाबत बेस्ट परिवहन विभागातर्फे अनेक योजना राबवल्या जातात. मात्र सुविधांचा लाभ प्रवाशांना किती होतो हा संशोधनाचा भाग आहे. सध्या बेस्ट वाहक व प्रवाशांमध्ये चिल्लरवरून वाद होताना पाहावयास मिळतो.
सहा, आठ रुपयांच्या तिकिटासाठी प्रवासी १० रुपये अथवा २० रुपयांची नोट देतात. बसवाहकाकडे अपुरी चिल्लर असल्याने प्रत्येक प्रवाशास सुट्टे पैसे परत करणे अशक्य होते. प्रवाशांकडे सुट्या पैशांची मागणी केल्यास बसवाहक व प्रवाशांमध्ये भांडणे होत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहकांमधील वाद मिटवण्यासाठी बसवाहकांना किमान १०० रुपयांची चिल्लर देण्याची सुविधा लवकरच करण्यात येणार असल्याचे दुधवडकर म्हणाले.