मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय़रेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जमीन मालकाला रेडी रेकनर दराच्या दुपटीपर्यंत मोबदला देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
दारिद्रय़रेषेखालील आणि भूमिंहीन शेतमजूर कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणा-या खर्चापैकी ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते. रेडी रेकनरची किंमत अधिक २० टक्क्यांपर्यंत प्रथम वाढ देण्यात येईल. तरीसुद्धा जमीन विकत मिळत नसल्यास १०० टक्क्यांपर्यंत म्हणजेच रेडी रेकरनर दराच्या दुपटीपर्यंत मोबदला देण्यात येईल.
साता-याच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
सातारा येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची जागा कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शासनाकडून सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विद्युत निरीक्षणालय ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली आणल्यानंतर याचे नियंत्रण करण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षक पद मंजूर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यातील तीन सैनिकी शाळांतील अतिरिक्त १८ तुकडय़ांतील ३६ शिक्षक पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी २० टक्के अनुदान मंजूर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यात यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा (सुपखेला, ता. जि. वाशिम), राजीव गांधी मिलिटरी स्कूल (कोलवड, ता.जि. बुलढाणा) आणि ईश्वर देशमुख सैनिकी शाळा (सावंगा बुद्रुक, ता. जि. यवतमाळ) या सैनिकी शाळांचा समावेश असून त्यांना प्रत्येकी सहा तुकडय़ा आणि प्रति तुकडी दोन प्रमाणे ३६ शिक्षकपदे मंजूर करण्यात आली आहेत.
आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती
नैसर्गिक आपत्तींच्या घटनांसह त्यामध्ये न मोडणा-या आपत्तींच्या इतर घटनांमध्ये आपद्स्तांना मदत मंजूर करण्याचे निर्णय घेण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास तसेच या उपसमितीस अधिकार प्रदान करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
स्वस्त धान्य दुकानांत ३५ रुपये दराने तूरडाळ
राज्यातील ग्राहकांच्या हितासाठी स्वस्त धान्य दुकानातून सध्या विक्री करण्यात येत असलेल्या तूरडाळीच्या प्रति किलो ५५ रुपयांच्या दरात सुधारणा करण्यात आली असून आता प्रति किलो ३५ रुपयांप्रमाणे विक्री करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.