मराठी नाटक आणि चित्रपटाला सातासमुद्रापार घेऊन जाणा-या ‘मिक्ता’चा सोहळा आज मकाऊच्या बेटावर रंगला.
मकाऊ – मराठी नाटक आणि चित्रपटाला सातासमुद्रापार घेऊन जाणा-या ‘मिक्ता’चा सोहळा आज मकाऊच्या बेटावर रंगला. नृत्य, गीत, संगीत आणि संवादाची रुपेरी झालर पांघरून साजरा झालेल्या या सोहळ्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि प्रसिद्ध नाटय़-सिने अभिनेते नाना पाटेकर यांना ‘गर्व महाराष्ट्राचा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात दुनियादारी या चित्रपटाचा सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला.
‘मी आजपर्यंत कोणताही पुरस्कार घेतलेला नाही. हा माझा पहिलाच पुरस्कार आहे. माझ्याबाबत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात जे सौजन्य आहे ते इतर कुठेही नाही. मी आज जो काही आहे ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेमुळेच. त्यासाठी त्यांचा आभारी आहे. जीवनात जे काही करायचं आहे ते आत्मविश्वासाने करण्याची व आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडण्याची शिकवण आईने दिली,’ असे भावोद्गार शरद पवार यांनी या वेळी काढले.
महाराष्ट्र कलानिधी आणि म्हैसकर फाउंडेशनच्या सहकार्याने हा सोहळा साजरा झाला. या वेळी शरद पवार यांची मुलाखत सचिन खेडेकर, वंदना गुप्ते व अनिरुद्ध देशपांडे यांनी घेतली. सुशांत शेलार, महेश मांजरेकर या वेळी रंगमंचावर उपस्थित होते. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा हा आंतरराष्ट्रीय जागर साजरा करण्यासाठी महाराष्ट्र कलानिधीचे प्रवर्तक नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले. यानंतर मुख्य पुरस्कार सोहळा सुरू झाला.
पुरस्कार सोहळय़ाचा आरंभ झाला तो पद्मजा फेणाणी यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने. त्यानंतर विविध गाण्यांच्या एका कोलाजने या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच रंग भरायला सुरुवात केली. यानंतर चित्रपटासाठीचे पुरस्कार देण्यात आले.
रंगभूषा : लक्ष्मण जाधव (धग), वेशभूषा : मेघना जाधव (बीपी), कलादिग्दर्शन: भूपेंद्र सिंग (धग), कथा : अंबर हडप, गणेश पंडित (बालक पालक), पटकथा : चिन्मय मांडलेकर, संजय जाधव (दुनियादारी),
संवाद : अजित दळवी, प्रशांत दळवी (आजचा दिवस माझा), खलनायक : जितेंद्र जोशी (दुनियादारी), गीतकार : दासू वैद्य (आजचा दिवस माझा), संगीतकार : अशोक पत्की, पार्श्वसंगीत मंगेश धाकडे, (आजचा दिवस माझा), गायकाचा पुरस्कार सोनू निगम याला तर गायिकेचा पुरस्कार सायली पंकज हिला ‘टिकटिक वाजते डोक्यात’ या ‘दुनियादारी’तल्या गाण्यासाठी देण्यात आला. यानंतर ‘दुनियादारी’च्या कलाकारांनी याच गाण्यावर एक बहारदार नृत्य सादर केले. त्यानंतर ‘गर्व महाराष्ट्राचा’ या पुरस्कारासाठी नाना पाटेकर यांच्यावर लिहिलेल्या मानपत्राचं वाचन सुनील बर्वे यांनी केले आणि हळूहळू वातावरण भारावले. या वेळी नानाच्या नृत्यांची स्टाईल असलेल्या गीतांची एक मालिका दाखवण्यात आली. नानांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले.
आज रंगलेल्या या पुरस्कार सोहळय़ात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘दुनियादारी’ने पटकावला. दिग्दर्शक संजय जाधवसह या चित्रपटाचा नायक अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.