मध्य रेल्वे मार्गावर दिवा स्थानकादरम्यान एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबई- मध्य रेल्वे मार्गावर दिवा स्थानकादरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. जलद मार्गावरील लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.
बुधवारी सकाळच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकादरम्यान उद्योनगरी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू होती. जलद मार्गावरील लोकल गाड्या धिम्या मार्गावरून धावत होत्या.
गेल्या तीन दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरू असलेला मेगाब्लॉक आणि बुधवारी वाहतूक विस्कळीत झाल्याने सलग चार दिवस प्रवाशांचे हाल होत आहेत. मंगळवारी हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.