सिनेसृष्टी आणि तिथलं जीवन याबाबत कुतूहल सर्वानाच असतं. सा-यांनाच या चित्रमय दुनियेच्या आत नेमकं काय चाललेलं असतं हे जाणण्याची उत्सुकता असते. रसिकांची हिच उत्सुकता लक्षात घेऊन सूर्यतेज प्रॉडक्शननं ‘नटी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
१९ सप्टेंबरला उलगडणार ‘नटी’ चे जीवन रहस्य!
सिनेसृष्टी आणि तिथलं जीवन याबाबत कुतूहल सर्वानाच असतं. सा-यांनाच या चित्रमय दुनियेच्या आत नेमकं काय चाललेलं असतं हे जाणण्याची उत्सुकता असते. रसिकांची हिच उत्सुकता लक्षात घेऊन सूर्यतेज प्रॉडक्शननं ‘नटी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गिरीष भदाणे यांची निर्मिती असलेला ‘नटी’ चित्रपट १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. आजवर वेगवेगळ्या विषयांवरील वैविध्यपूर्ण आशयघन सिनेमे देणा-या सौ. नीता सुरेश देवकर या सिनेमाच्या सादरकर्त्यां आहेत. दिग्दर्शक योगेश रमेश जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. लांबून एखाद्या मृगजळाप्रमाणे भासणारी चंदेरी दुनिया नेमकी कशी आहे?..इथे वावरणा-या कलाकारांची जीवनशैली कशी असते?..इथे येणा-या प्रत्येकालाच ही इंडस्ट्री स्वीकारते का?..इथे येणा-या प्रत्येकाचं स्वप्न साकार होतं का?..आणि याहीपेक्षा नायिका बनू पाहणा-या सर्वसामान्य मुलीचं इथे आल्यावर काय होतं?..तिला कशाप्रकारे तडजोड करावी लागते याचं चित्रण या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
नीता देवकर व दिग्दर्शक योगेश जाधव यांनी या सिनेमाचं पटकथा लेखन केलं आहे. या चित्रपटाच्या सादरकर्त्यां व संकल्पनाकार नीता देवकर सांगतात, ही कथा मराठी सिनेसृष्टीत कारकीर्द घडवू पाहणा-या सर्वसामान्य कुटुंबातील एका जिद्दी मुलीची आहे. मराठी सिनेअभिनेत्रींची जीवनशैली पडद्यावर आणण्याचा प्रयत्न हा सिनेमा करेल. सुश्राव्य संगीताने सजलेली ही कलाकृती मराठी रसिकांसाठी एक पर्वणी ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
महिलाप्रधान सिनेमांमध्ये दमदार अभिनय करून रसिकांच्या मनावर अवीट ठसा उमटविणारी अभिनेत्री डॉ. तेजा देवकर ‘नटी’ मध्ये मुख्य भूमिकेत चमकणार आहे. तिच्यासोबत सुबोध भावे आणि अजिंक्य देव मुख्य भूमिकेत असून किशोरी शहाणे-विज, किशोर कदम, प्रिया बेर्डे, नागेश भोसले, शशांक शेंडे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुने, किशोर चौघुले, दिप्ती भागवत, ऐश्वर्या तुपे आदी कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. प्रसिध्द कॅमेरामन सुरेश देशमाने या सिनेमाचे छाया दिग्दर्शक असून संगीत दिग्दर्शन संगीतकार निखिल महामुनी यांनी केलं आहे. गीतकार बाबा चव्हाण, दिपक अंगेवार, मंदार चोळकर आणि चंद्रकांत गायकवाड यांची गीतं आशा भोसले, आनंद शिंदे, डॉ. नेहा राजपाल, जावेद अली यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायली आहेत. नृत्य दिग्दर्शक राजेश बिडवे यांनी ही गीते तितक्याच कौशल्याने पडद्यावर सादर केली आहेत.
विविध विषय हाताळणारी मराठी इंडस्ट्री सध्या जोमात आहे. वेगवेगळे विषय, त्यांची कलात्मक पण तितक्याच सुबकतेने मांडणी करून मराठीच नव्हे तर इतर भाषांतही आपला वेगळा ठसा उमटविला आहे. याच वेगळ्या विषयाच्या विश्वातील पुढचे पाऊल म्हणजे ‘प्रेमासाठी कमिंग सून’. प्रेम, उत्कंठा, रोमांच, साहस अशा विविध पैलुंनी साकारलेला असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटाची निर्मिती अनुपकुमार पोद्दार, संजय संकला, अमन विधाते, मुलचंद देढिया यांनी केली असून अंकुर काकटकर यांचे दिग्दर्शन आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटांसाठी आणि त्यांच्या प्रॉडक्शनसाठी कॅमेरामन म्हणून काम करणारे अजित रेड्डी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच एका दुस-या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत काम करत आहेत. आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे, जितेंद्र जोशी, विजय पाटकर, रेशम टिपणीस, सुहास जोशी, आंचल पोद्दार हे या चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत. त्यांच्याभोवतीच चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चिन्मय कुलकर्णी यांची असून संजय संकला चित्रपटाचे संकलन करणार आहेत. चेतन डांगे या चित्रपटाचे गीतकार असून प्रेम आणि रहस्य अशा दुहेरी छटा असलेल्या या चित्रपटाला संगीत पंकज पाडगहन यांनी दिले आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी उमेश जाधव यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, पुणे येथे झाले आहे. सध्या चित्रपटाचे संकलन सुरु आहे
भारतीय चित्रपटांमध्ये संगीताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सुमार कथानक, अभिनय असलेल्या मात्र फारच सुरेख संगीत असलेल्या अनेक यशस्वी चित्रपटांची आपल्याला जंत्री देता येते. भारतात अनेक दिग्गज संगीतकारांनी आपली कारकिर्द फुलवली. त्याचबरोबर रसिकांनाही आनंद मिळाला. चित्रपटाच्या संगीताबरोबरच या गीतांच्या ध्वनीमुद्रणालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आताशा हे ध्वनीमुद्रण संगणकांच्या सहायाने तुकडय़ा तुकडय़ांमध्य़े होत असते. सुरुवातीच्या काळात मात्र गायक व वादक हे एकत्र येऊन ते गाणं सलग वाजवून त्याचे ध्वनीमुद्रण करत असत. त्यामुळे गाण्याचा गोडवा व लय कायम राखण्यात मदत होत असे. हाच प्रयोग पुन्हा करण्याचा विडा तरुण संगीतकार विजय राजवाडे यांनी उचलला आहे. ते आपल्या आगमी मराठी चित्रपटाच्या ध्वनीमुद्रणासाठी हे तंत्र वापरणार आहेत. त्यासाठी त्यांनी एका तालमीचेही आयोजन नुकतेच केले होते. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदी मराठीतले अनेक नामवंत संगीत दिग्दर्शकही उपस्थित राहिले होते हे विशेष. या गीताचे ध्वनीमुद्रण हे लवकरच यशराज स्टुडिओ इथे होणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचे नाव व गीत हे गुलदस्त्यात राहिले असले तरी देखील या जुन्या काळातल्या ध्वनीमुद्रणाने अनेक नव्या गोष्टींना व तंत्राला नवसंजीवनी मिळू शकते. अशा पद्धतीचे धाडस केल्याबद्दल संगीतकार विजय राजवाडे व त्यांच्या टीमचे खरोखरच अभिनंदन करायला हवे.