‘आप’चे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मयांक गांधी यांच्या विरोधात निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुंबई- ‘आप’चे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मयांक गांधी यांच्या विरोधात निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयांक गांधी यांनी निवडणूक आयोगाला कोणतीही अधिकृत माहिती न देता प्रचार फेरी काढल्यामुळे निवडणूक अधिका-यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
मुंबईतील ‘आम आदमी पक्षा’चे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मयांक गांधी यांच्यातर्फे १३ एप्रिल रोजी अंधेरीतल्या आंबेकरनगर येथून एमआयडीसीपर्यंत प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांनी या प्रचार फेरीबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. तसेच या प्रचार फेरीत सहभागी झालेल्या वाहनांवर परवानगी नसताना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात आला होता.
निवडणुकी दरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत आपचे उमेदवार मयांक गांधी यांच्या विरोधात अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.