मराठवाडा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठेवा आहे. अनेक राजांची राजवट, निजामशाही येथे नांदली. त्यामुळे येथील भारतीय संस्कृती, धर्म, अर्थ, कला आणि वाङ्मयामध्ये विविधता आढळते. हा भूप्रदेश नानाविध कलांनी समृद्ध आहे. मराठवाडय़ाचे ऐतिहासिक सौंदर्य, संत, सत्पुरुष, मठ, मंदिर, घराणी, गुरुद्वारे, लेण्या, गडकोट, वाङ्मय, संस्कृती अशी अनेक वैशिष्टय़े. मराठवाडय़ाच्या या समृद्ध परंपरेत दाखल होतोय नवा मराठी सिनेमा ‘रॉमकॉम. औरंगाबाद आणि अहमदनगरपासून जवळ असलेल्या वैजापूर शहरात हा गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’हा प्रेमपट बहरतो आहे.
नवोदित जोडी मधुरा वैद्य आणि विजय गीते यांच्यासह किशोर कदम, असित रेड्डी, छाया कदम हे दिग्गज कलावंत असलेला हा चित्रपट त्याच्या आगळय़ावेगळय़ा लोकेशनमुळे सध्या चर्चेत आहे. याबद्दल दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांनी सांगितले की, ‘‘चित्रपटाचे कथानक हे याच भागातले असल्यामुळे त्यांची बोलीभाषा व इतर सर्व गोष्टी या वैजापूरशी मिळत्याजुळत्या आहेत.
त्यामुळे निर्माते सचिन शिंदे यांनी हा चित्रपट याच भागात चित्रित करण्याचे ठरवले.’’ ‘रॉमकॉम’ चित्रपटाच्या जवळपास महिनाभराचे शूटिंग स्थानिकांच्या अमूल्य सहकायार्मुळे पूर्ण होऊ शकले, त्यांच्या आदरातिथ्याने चित्रपटाची टीम भारावून गेल्याचे क्रिएटिव्ह हेड मृदुला वैभव आणि वेशभूषाकार शीतल पावसकर यांनी सांगितले. ‘रॉमकॉम’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून, लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असे निर्माते सचिन शिंदे यांनी सांगितले