‘स्टार प्रवाह’वर नुकताच सुरू झालेला ‘सुप्रिया-सचिन शो’ खरंच उत्तम आहे. म्हणजे सुरुवातीला बोलवलेल्या पाहुण्यांचे एपिसोड छान झाले. आता तशी प्रतीक्षा आहे ‘जावई विकत घेणे’ची.
खरंच आपण किती चांगल्या चित्रपटांना मुकतो, याची जाणीव ‘डीडी’ चॅनल सतत अधोरेखित करून देत असते. कारण मध्यंतरी ‘एक कप च्या’ नावाचा चित्रपट लागला होता. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने केलेला हा चित्रपट! ७३ हजार रुपये विजेचं बिल आल्याने काशिनाथ (किशोर कदम) तक्रार करतो. पण त्याला असं कळतं की, जर हे बिल भरायचं नसेल, तर लाच देणं महत्त्वाचं आहे. आणि तोच ‘एक कप च्या’! त्यात काशिनाथच्या मुलाची दहावीची परीक्षा, त्यामुळे वीज लवकरात लवकर यावी, यासाठी त्याची धडपड चाललेली असते. मग काशिनाथची ओळख ‘माहितीचा अधिकारा’बद्दल जागरूकता निर्माण करणा-या एका कार्यकर्तीशी होते. मग तो केस फाइल करतो, मुंबईला जायला निघतो. तिकडे सुनावणी होऊन गेलेली असते. पण कशी कोण जाणे, वीज येते, त्याचबरोबर मुलगा महाराष्ट्रातून दुसरा आला, हीसुद्धा बातमी येते आणि चित्रपट संपतो, पण कायमसाठी आपल्या मनावर कोरला जातो. त्यात नेहमीप्रमाणे किशोर कदमचा अभिनय बेस्ट. त्यातून अश्विनी गिरी हिनेही काशिनाथच्या बायकोची भूमिका उत्तम साकारलीय. थोडक्यात काय, तर असे उत्तमोत्तम चित्रपट ‘डीडी’वर कधी लागतील, सांगता येत नाही. पण लागले की बघायचेच!
बाकी ‘स्टार प्रवाह’वर नुकताच सुरू झालेला ‘सुप्रिया-सचिन शो’ खरंच उत्तम आहे. म्हणजे सुरुवातीला बोलवलेल्या पाहुण्यांचे एपिसोड छान झाले. आता तशी प्रतीक्षा आहे ‘जावई विकत घेणे’ची. नक्की काय प्रकार आहे, हे अजून तरी कळत नाहीय. लवकरच कळेल पण ते.
गेली पाच-सहा वर्ष सुरू असणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हे म्हणजे खरंच एक कोडं आहे. कुठल्याही लीप नाहीत, सासू-सुनांची नेहमीची भांडणं नाहीत, नायक-नायिका त्यांची अफेअर्स, हासुद्धा काही प्रकार नाही. तरी ही मालिका एवढी चालली, म्हणजे खरंच आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट आहे. फक्त ‘हलकी फुलकी कॉमेडी’ यावर ही विनोदी मालिका बरीच बाजी मारतेय. एवढी की त्याचा टीआरपीसुद्धा बाकी ‘सास-बहु’वाल्या मालिकांना मिळतो, त्यापेक्षा जास्त आहे. पण यामुळे एक नक्की झालं की, ‘सोनी सब’ हे चॅनल फक्त अशा हलक्याफुलक्या मालिकांनाच वाहून घेतलेलं चॅनल आहे, हे उत्तमरीत्या ठसवलं गेलं आणि महत्त्वाचं म्हणजे बाकी मालिकांनी अशा ‘विनोदी’ अंगाने जाणा-या मालिकाच दाखवणं बंद केलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, मराठीतही अशा प्रकारची चॅनल येणं, आता गरजेचं वाटायला लागलंय.
‘स्टार प्लस’वर पूर्वी लागणारी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेच्या धर्तीवर ‘स्टार प्रवाह’वर ‘माधुरी मिडलक्लास’ ही (विनोदी म्हणवणारी) मालिका लागते. ऊठसूट डोंबिवली आणि तिथे असलेल्या प्रसिद्ध गोष्टींवर घेतलेलं तोंडसुख याच्या पलीकडे मालिकेत दुसरं काही नाही. ‘ईटीव्ही’वर लागणारी ‘१७६० सासुबाई’ या विनोदी मालिकेचा विषय खरंच छान आहे. नावीन्य आहे. पण कसलं काय? नंतर ती मालिका एवढी भरकटली की विचारता सोय नाही. ‘झी मराठी’वर लागणारी ‘शेजारी शेजारी पक्केशेजारी’ हिने सुरुवातीला गाजावाजा केलेला असला, तरी नंतर मात्र बाकी मालिकांमध्ये बिचारी हरवून गेली. ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या मालिका म्हणजे सीझनल! कधी चांगल्या असतील, तर कधी नाही. थोडक्यात काय, विनोदी मालिकांचे असे तीन-तेरा मराठी चॅनलवर लागल्याने, फक्त ‘मराठी विनोदी मालिका’ दाखवल्या जातील, असं वेगळं चॅनलच असावं, असं प्रेक्षकांना फार वाटायला लागलंय. ते सोप्पं नक्कीच नाहीय, पण प्रेक्षक म्हणून आपल्याला उपाय सुचवायला काहीच हरकत नाही.
आता विनोदी मालिकांचा विषय निघालाच आहे, म्हणून एक नक्की सुचवते. ‘झी कॅफे’वर ‘अमेरिकन फनिएस्ट होम व्हीडिओ’ असा कार्यक्रम लागतो. अमेरिकन लोकांच्या घरीच काढलेल्या पण फनिएस्ट असणा-या व्हीडिओज इथे दाखवले जातात. आता जरा भारतीय अस्मिता बाजूला ठेवून निखळ आनंद घ्यायचा असेल, तर नक्की बघा! त्यात मुद्दामहून केलेला विनोद नसतो, उगाच पांचट हावभाव नसतात, अतिविनोदी अशी स्किट्सही नसतात. सगळ्या होममेड व्हीडिओज. साधारणपणे रात्री दहाच्या सुमारास किंवा संध्याकाळी पाचच्या सुमारास लागतो हा कार्यक्रम. जरा विनोदाचं एक वेगळं ‘होममेड’ अंग बघायला मिळेल.