गोवंडी अत्यंत गर्दीचा परिसर. झोपडपट्टी, लघुउद्योग अशांनी भरलेला हा परिसर आहे. महिलांची संख्या पाहता, प्रसाधनगृहांची कमतरता आहे.
मुंबई – गोवंडी अत्यंत गर्दीचा परिसर. झोपडपट्टी, लघुउद्योग अशांनी भरलेला हा परिसर आहे. महिलांची संख्या पाहता, प्रसाधनगृहांची कमतरता आहे. महिलांच्या छेडछाडीचे प्रमाणही जास्त आहे. पश्चिमेकडील वस्तींची अवस्था, कचराकुंडया आणि सतत होणारी छेडछाड, प्रसाधनगृहांबाहेर असलेले टवाळखोर यांच्यामुळे सुरक्षिततेची गरज भासते. पूर्वेकडे तर प्रसाधनगृह शोधून सापडणार नाही.
गोवंडी (पश्चिम)
गदुल्ले, मवाली, नशेबाजांचा अड्डा म्हणजे गोवंडी पश्चिम परिसर! या गलिच्छ वस्तीत महिला प्रसाधनगृह टापटीप दिसणारच नाही. उलट महिला प्रसाधनगृहासमोर किती कचरा टाकावा, अशी स्पर्धा येथे रंगलेली असते. कित्येक प्रसाधनगृहांत स्वच्छता नाही, पाणी नाही. पाण्याविना परिसरात दुर्गंधी असते. प्रत्येक प्रसाधनगृहांदरम्यान, १५ ते २० मिनिटांचे अंतर आहे. जागोजागी मुलांचा घोळका टवाळक्या करताना दिसतो. साध्या रस्त्यावरही महिला सुरक्षित नसल्याचे जाणवते. दिवसाढवळ्या या ठिकाणी महिलांची छेड काढली जाते. लहान मुलापासून युवकापर्यंत सगळेच नशेत दिसतात.
महिला प्रसाधनगृहाबाहेरच अस्वच्छता कशी राखावी, याचे पहिलेच उदाहरण टाटा नगरमधील प्रसाधनगृहात आढळते. महिलांना पुरुषी नजरांचा, अश्लील शब्दांचा सामना करत प्रसाधनगृह गाठावे लागते. त्यापैकी रफीक नगर भाग-१ येथील पोलिस बीटच्या बाजूला असलेल्या महिला प्रसाधनगृहाच्या खिडक्यांना चक्क गोणपाट लावले आहे. फलकाची कल्पना नसल्याने येथे पैसे आकारणीचा धंदा सर्रास चालतो. रफीक नगर भाग-२ येथील भारतीय एकता संघाचे प्रसाधनगृह डम्पिंग ग्राउंड बनले आहे. मागील बाजूस असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे येथे दुर्गंधी असते. प्रसाधनगृहाच्या दारापर्यंत कच-याचा ढिग दिसतो. शिवाय प्रसाधनगृहाबाहेर नशा करणा-या मुलांचा अड्डा आहे. नाइलाजास्तव महिला या प्रसाधनगृहाचा वापर करतात.
डेपोच्या बाजूकडच्या प्रसाधनगृहात काही वेगळी परिस्थिती नाही. संजयनगर येथील प्लॉट नंबर नऊ मधील नाव नसलेल्या प्रसाधनगृहाचा कंत्राटदार ओळखीच्या महिलांसाठी मोफत प्रसाधनगृहाची सोय देतो. अनोळखी महिलांना पैसे आकारले जातात. पुढे भारत सेवा संघ सार्वजनिक शौचालयात पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांचे एकत्रीकरणच दिसते. एक प्रसाधनगृह जवळपास अडगळीच्या सामानाचे स्टोअर रूम बनवले आहे. निरंकारी नगर येथील महापालिकेच्या प्रसाधनगृहात दुर्गंधी असते!
गोवंडी स्थानकानजीकचे सुलभ शौचालय सोडतले तर संपूर्ण गोवंडी पूर्व परिसरात प्रसाधनगृहांची वानवा आहे. केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही येथे प्रसाधनगृह उपलब्ध नसल्याची भयानक स्थिती आहे. स्थानकाजवळ असलेल्या सुलभ शौचालयातील कंत्राटदाराला १० दिवसांपूर्वीच फलक मिळाले आहेत. या प्रसाधनगृहातच कंत्राटदाराने संसार थाटला आहे. त्यानंतर थेट पंजाबवाडी, टेलिकॉम फॅक्टरीनजीक खासगी प्रसाधनगृह आहे. या प्रसाधनगृहात महिला मोफत प्रसाधनगृहाची सोय असली तरी चेकलिस्ट उपलब्ध नसल्याचे येथील कंत्राटदार महिला सांगतात. ही दोन प्रसाधनगृह वगळता संपूर्ण गोवंडी पूर्व परिसरात प्रसाधनगृह नाही.
प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसोबत महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. – मुमताज शेख, कार्याध्यक्ष, महिला मंडळ, फेडरेशन