बनावट शस्त्र परवान्याच्या सहाय्याने मुंबईत शस्त्रास्त्र विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे.
मुंबई – बनावट शस्त्र परवान्याच्या सहाय्याने मुंबईत शस्त्रास्त्र विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. याकुबअली रौफ (४६) आणि जमाल हुसैन (३४) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी आसाम जिल्ह्यातील आहेत.
हे दोघेजण मुंबई शस्त्रविक्रीसाठी आल्याची एटीएसला टीप मिळाली होती. त्यानुसार एटीएसने सापळा रचून या दोघांना वडाळा येथून अटक केली. त्यांच्याकडून बारा बोअरच्या पाच रायफल्स, १७ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन आणि चार बनावट परवाने जप्त केले आहेत.
हे दोन्ही आरोपी जम्मू-काश्मीरमधुन शस्त्रास्त्रे आणायचे. २५ ते ३५ हजार रुपयांना ते शस्त्रास्त्र विकत होते. तुर्भे, नवी मुंबईतील एका गुन्ह्यात त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. कलम ४६५, ४६६ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांची कसून चौकशी सुरु आहे.