कुर्ला पश्चिमेला राहणा-या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने एलबीएस मार्गावर एसटी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – कुर्ला पश्चिमेला राहणा-या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने एलबीएस मार्गावर एसटी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, दादर आणि परळ येथून सुटणा-या एसटीच्या अनेक गाडया यापुढे कुर्ला पश्चिमेला एलबीएस मार्गावर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कुर्ला न्यायालयाजवळ असलेल्या एसटीच्या जागेवर संगणकीय आरक्षण केंद्र सुरू केले जाणार असून, चार आणि सात दिवसांचा पासही उपलब्ध करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे कुर्ला पश्चिमेतील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
कुर्ला पश्चिमेला राहणा-या प्रवाशांना आपल्या गावी एसटीने जायचे झाल्यास दादर, सायन, कुर्ला (पू.) अथवा घाटकोपरला जावे लागते. यापुढे कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावरील कुर्ला न्यायालयाजवळ एसटी थांबणार असून, कोकणसह महाराष्ट्रातील कानाकोप-यात जाणा-या प्रवाशांना त्याचा लाभ होईल.
कुर्ला-राजापूर, कुर्ला-दापोली, कुर्ला-गुहागर, मुंबई-आटपाटी, मुंबई-पारनेर, मुंबई-वळूज, परळ-पारनेर, मुंबई-आळेफाटा, मुंबई-नारंगगाव, परळ-आकोला, परळ-गंगापूर, मुंबई-जुन्नर, परळ-बेला, परळ-आटपाटी या मार्गावर जाणा-या सर्व एसटी गाडय़ा यापुढे कुल्र्याला थांबतील. तसेच कुर्ला येथे संगणकीय आरक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. तसेच चार आणि सात दिवसांचे पासही उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे कुर्ला पश्चिमेतील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
शिर्डी, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर आणि पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी कुर्ला येथून लवकरच एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करणे हेच एसटी महामंडळाचे ध्येय आहे.
– कैलाश थोरात, एसटी आगार प्रमुख, कुर्ला (पू.)