मुंबईत रविवारी होणा-या मॅरॅथॉन स्पर्धेमुळे बेस्ट प्रशसानाने या दिवशी काही बसच्या मार्गामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – मुंबईत रविवारी होणा-या मॅरॅथॉन स्पर्धेमुळे बेस्ट प्रशसानाने या दिवशी काही बसच्या मार्गामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर १०५, १०६, १०८, १२३, १२५, १३२, १३३ आणि १५५ या बसमार्गाच्या फे-या दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मंत्रालय, मेयो रोड (हुतात्मा चौक), बाबुलनाथ, वाळकेश्वर, कमला नेहरू पार्क, वरळी डेअरी आणि ग्रँट रोड या स्थानकांतील चौक्याही दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहतील. मात्र, त्यानंतर सर्व फे-या आणि बसचौक्या सुरू राहतील, असे कळवण्यात आले आहे.
महात्मा फुले मार्केट/सीएसटीकडून कुलाबा, नेव्हीनगरकडे जाणा-या बसचे मार्ग रविवारी कर्नाक ब्रीज, कर्नाक बंदर, पी. डीमेलो रोड आणि शहीद भगतसिंग मार्गाने, तर कृष्णचंद मार्गाने (लीलावती हॉस्पिटल) बांद्रा रेक्लमेशनकडे जाणाऱ्या बस हिल रोड मार्गे वळवण्यात येतील. वाहतुकीची कोंडी झाल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दक्षिण मुंबईकडे जाणारे सर्व बसमार्ग धारावी टी जंक्शन आणि शीव मार्गे, तर स्वामी विवेकानंद मार्गावरून दक्षिण मुंबईकडे येणारे सर्व बसमार्ग धारावी टी जंक्शन, शीव मार्गे अथवा मोरी रोड सेनापती बापट मार्गाने वळवण्यात येणार आहेत.
वीर सावरकर मार्गावरून जाणारे सर्व बसमार्ग परळ एसटी आगार, पाडुरंग बुधकर मार्ग, कॉ. पी. के. कुरणे चौक, जी. एम. भोसले मार्ग, ई. मोझेस मार्ग, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजीअली, वसंतराव नाईक चौक, नाना चौक, पं. पलुस्कर चौक मार्गे वळवण्यात आले आहेत. बसमार्गामधील या बदलांची नोंद सर्व प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.