लोकल रेल्वेसोबत मेट्रोमध्येही वारंवार होणा-या तांत्रिक बिघाडाने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मुंबई- लोकल रेल्वेसोबत मेट्रोमध्येही वारंवार होणा-या तांत्रिक बिघाडाने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. सोमवारी सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळेत मेट्रो सेवा खोळंबल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सकाळी १०च्या सुमारास साकीनाका स्थानकादरम्यान जवळपास १५ मिनिटे मेट्रो थांबून होती. त्यामुळे मेट्रो सेवा उशिराने चालत होत्या. स्थानकादरम्यान असणा-या ओव्हरहेड वायरवर एखादी वस्तू लटकत असल्याचे मेट्रो चालकाच्या निदर्शनास आल्याने त्याने तात्काळ मेट्रो थांबवली. वायरवरील अडथळा दूर केल्यानंतर मेट्रो सेवा पूर्ववत चालू करण्यात आल्याचे मेट्रो प्रवक्त्याने सांगितले.
कोटय़वधी रुपये खर्च करत उभारण्यात आलेल्या मेट्रो सेवेत अलीकडे वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोमवारी ऐन कामाच्या वेळी मेट्रो सेवा खोळंबल्याने स्थानकांवर गर्दी निर्माण झाली होती. घाटकोपरच्या दिशेने जाणा-या मेट्रो चालकाला साकीनाका स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर काही तरी लटकत असल्याचे दिसताच मेट्रो सेवा थांबवण्यात आली. चालकाने त्वरित मेट्रो प्रशासनाला याबाबत कळवले. त्या वस्तूला काढण्यासाठी ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला. परिणामी मार्गावरील सर्व मेट्रो सेवा जागच्या जागी खोळंबल्या होत्या. वायरवरील वस्तू काढण्यासाठी मेट्रो कर्मचारी स्थानकावर दाखल झाले. अडथळा दूर केल्यानंतर मेट्रो सेवा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे, ‘मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड’च्या प्रवक्त्याने सांगितले.