मुंबईतील रस्त्यांच्या डेब्रिजच्या चौकशीची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे रस्त्यांवरील या डेब्रिजची विल्हेवाट अन्य ठिकाणी भराव भूमीत करण्याऐवजी चक्क खाडीच्या परिसरात केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई- मुंबईतील रस्त्यांच्या डेब्रिजच्या चौकशीची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे रस्त्यांवरील या डेब्रिजची विल्हेवाट अन्य ठिकाणी भराव भूमीत करण्याऐवजी चक्क खाडीच्या परिसरात केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर येथील नाल्याशेजारी असलेल्या वासरी हिल परिसरातील खारफुटीच्या जागेवर डांबरी आणि पेव्हर ब्लॉकच्या डेब्रिजचा भराव करून खारफुटीची जागा बुजवली जात आहे. नाला रुंदीकरणासाठी नेमलेल्या कंत्राटदारांच्या मदतीनेच हा भराव केला जात असून हा भरावच खारफुटीच्या मुळावर आल्यामुळे आसपासच्या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर नाल्याच्या रुंदीकरणाचे काम मागील दोन ते अडीच वर्षापासून सुरू आहे. या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम आता पूर्णत्वास येत असून या नाल्याच्या शेजारी असलेल्या खाडीच्या भागात नाले रुंदीकरणाचा फायदा घेऊन तिथे भराव करत तिवरांची झाडे मारली जात आहेत. ही बाब लक्षात येताच स्थानिक नगरसेविका स्नेहा झगडे यांनी त्वरित महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून खाडी परिसरातील अनधिकृत भरणी थांबवून त्यांची संबंधित अधिका-यांसह संयुक्तपणे पाहणी करावी,अशी मागणी केली आहे.
मात्र, तत्पूर्वी पी/दक्षिण विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे आणि त्यांच्या अधिका-यांसह नगरसेविका झगडे यांनी जागेची पाहणी करूनही ही अनधिकृत भरणी होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र आजतागायत यावर महापालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई झालेली नाही. उलटपक्षी याठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अनेक ट्रक याठिकाणी रिकामे केले जात आहेत.
प्रेमनगर नाल्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे याठिकाणी पत्र्याचे कुंपण तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी नाला कंत्राटदाराची चौकी आहे. परंतु आजवर या नाल्याच्या कामांचे ट्रक आतमध्ये जात असल्याने याकडे लक्ष दिले नव्हते. परंतु रात्रीच्या वेळी याठिकाणी डांबरी रस्त्यांचे खोदलेले रॅबिट, पेव्हरब्लॉकसह दगड-मातीचे डेब्रिज ट्रकने याठिकाणी रिकामी केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर याची पाहणी केली तेव्हा चक्क खारफुटीची निम्म्याहून जागा बुजवली गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांसह पाहणी केली. परंतु त्यानंतरही कोणतीही दखल घेतली न गेल्यामुळे आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
..तर झोपडपट्टय़ांमध्ये शिरणार पाणी
बासरी हिल परिसरात सुमारे दीड ते दोन हजार झोपडय़ा आहेत. प्रेमनगरमधील पाणी आजवर या खाडी परिसरात वाहून जायचे. परंतु आता खारफुटीच्या या जागेवर भराव करण्यात आल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यात आता अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे या झोपडय़ांमध्ये पाणी शिरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय या भागातही पाणी तुंबून पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची भीतीही झगडे यांनी व्यक्त केली आहे.
डेब्रिज कंत्राटदाराचे की विकासकाचे?
या जागेच्या ठिकाणी कंत्राटदाराची चौकी असल्यामुळे रस्ते कंत्राटदारांकडून खोदकामाचे डेब्रिज याठिकाणी टाकले जात आहे. परंतु या कंत्राटदाराच्या आडून विकासकाकडून हा भराव टाकून ही खाडी बुजवली जात आहे का, असाही संशय व्यक्त केला जात आहे.