लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सोमवारीही त्याचे पडसाद उमटत होते.
अलिबाग- लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सोमवारीही त्याचे पडसाद उमटत होते. मुरूड जैन समाजातर्फे येथील तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही तर रायगड बेमुदत बंद करण्याचा इशारा मुरूड जैन समाजाने दिला आहे.
२७ फेब्रुवारी रोजी लोणावळा येथेही मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अनिल चोप्रा यांनी दिली.
अलिबागमध्ये आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या मोर्चात सर्वपक्षीय स्थानिक नेते सहभागी झाले होते.
काँग्रेसच्या अलिबाग शहर महिला अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, आम आदमी पक्षाचे दिलीप जोग, शांतीनाथ जैन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश जैन, कच्छी जैन ट्रस्टचे विश्वस्त दिनेश शहानंद आदी मोर्चात सहभागी झाले होते.
या मोर्चात महिलांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. मोर्चाच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष सुरक्षा शाह, माजी नगराध्यक्ष नमिता नाईक, मानसी म्हात्रे, शेकापच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील आदी उपस्थित होते.