सुट्टीच्या काळातील रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन तात्काळ तिकिटे काढून विकणाऱ्या बेकायदा दलालांना रेल्वेच्या फसवणूक विरोधी पथकाच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
मुंबई– सुट्टीच्या काळातील रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन तात्काळ तिकिटे काढून विकणाऱ्या बेकायदा दलालांना रेल्वेच्या फसवणूक विरोधी पथकाच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मुंबईतील शिवाजी नगर गोवंडी येथील एका सायबर कॅफेमध्ये राजेंद्र कुमार बाफना व महेश बाफना हे बेकायदा ई-तिकीट आरक्षित करत होते. या सायबर कॅफेवर पथकाने छापा मारला. या वेळी कुमार व महेश यांच्याकडून सुमारे ९ लाख ६२ हजार ७०५ रुपयांची ४८८ तिकिटे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, रेल्वे अधिनियम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ई-तिकीट प्रणाली अमलात आणली गेली आहे. मात्र रेल्वेचे बेकायदा दलाल मोठय़ा संख्येने तिकिटे काढून गरजू प्रवाशांना ती अवास्तव किमतीत विकतात, अशी तक्रार अनेकदा केली जाते. आरक्षणाशिवाय प्रवास शक्य नसणारे बहुसंख्य प्रवासी या दलालांना बळी पडतात. त्याच पार्श्वभूमीवर दलालांकडून होणा-या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कठोर पावले उचलत आहे.