महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी पुण्यातील लवासा येथे ‘सहाव्या लवासा वुमन्स रॅली’चे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई – महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी पुण्यातील लवासा येथे ‘सहाव्या लवासा वुमन्स रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी दोन हजार महिलांनी या रॅलीत सहभाग नोंदवल्यामुळे या रॅलीची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्ड’मध्ये होण्याची शक्यता आहे.
या रॅलीत मुंबईकर महिलांचा भरणा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठा होता. विशेष म्हणजे मुंबई ते लवासा हे पाच तासांचे अंतर कापले. मुंबईतून सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या रॅलीला अभिनेता कुणाल कपूर, मनीष पॉल, अश्मित पटेल या कलाकारांनी झेंडा दाखवला. मुंबईतून जवळपास अडीचशे गाडय़ांची नोंद रॅलीत झाली.
कर्करोगाला प्रतिबंध घाला, हा संदेश देण्यासाठी दरवर्षी लवासाकडून महिलांची कार रॅली आयोजित केली जाते. यानिमित्त महिलांच्या सशक्तीकरणाचीही प्रचिती येते. शिवाय त्यांना लवासा या पर्यटनस्थळाला भेट देण्याची संधीही मिळते, अशी माहिती लवासा कोर्पोरेशन लिमिटेडच्या मार्केटिंग आणि सेल्सच्या ज्येष्ठ उपाध्यक्ष अनुराधा पावसकर यांनी दिली. गेल्या पाच वर्षात सातत्याने मिळणारा प्रतिसाद पाहता, गेल्या दोन वर्षातील सहभागी महिलांची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्ड’ घेतली होती. त्यामुळे यंदा आम्ही ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी अर्ज केल्याची माहिती पावसकर यांनी दिली. सहभागी झालेल्या अनेक महिलांनी कर्करोगाव्यतिरिक्त अनेक सामाजिक विषयांना स्पर्श करणा-या ओळी आपल्या वाहनांवर रेखाटल्या होत्या. यात स्त्रीभ्रूणहत्या, चूल आणि मूलच्या पलीकडे कोर्पोरेट जगतात वावरणारी महिला, अत्याचारांना विरोध करणारी महिला, घरगुती हिंसाचार या विषयांचा समावेश होता.