लिबियातून युरोपकडे निघालेली बोट बुडून झालेल्या अपघाताच्या प्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
रोम- लिबियातून युरोपकडे निघालेली बोट बुडून झालेल्या अपघाताच्या प्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. ही बोट बुडणार असल्याचे स्पष्ट होताच त्यातील तस्करांनी शेकडो लोकांना कोंडून ठेवले होते. त्यामुळे त्यांना जीव वाचवणे अशक्य बनले, अशी माहिती या अपघातातून वाचलेल्या एका प्रवाशाने दिली आहे.
भूमध्य समुद्रात घडलेल्या बोट दुर्घटनेने जगावर शोककळा पसरली असून या अपघाताला जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जगभरातून केली जात आहे.
या दुर्घटनेतून एक बांगलादेशी नागरिक बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या माहितीनुसार, या बोटीत ९५० प्रवासी होते. त्यापैकी ३०० प्रवाशांना तस्करांनी कोंडून ठेवले होते. त्यात २०० महिला व काही मुलांचा समावेश होता. तर अधिका-यांच्या मते या बोटीतील प्रवाशांचा आकडा ७५० होता असे इटलीच्या सरकारी वकिलाने सांगितले आहे.
तर या दुर्घटनाग्रस्त बोटीच्या मदतीसाठी इटलीने १८ जहाजे रवाना केली असून आतापर्यंत २८ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शिवाय २४ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती इटलीचे पंतप्रधान मॅटिओ रेंझी यांनी दिली. या भागातील समुद्र अत्यंत खोल असल्यामुळे मदतकार्यात पाणबुडयांची मदत घेतली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
ग्रीसमध्येही बोट उलटली!
येथील- होड्स बेटांजवळ टर्कीमधील स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत ८०पेक्षा जास्त प्रवासी होते. त्यातील मृत्युमुखी पडलेले तिघे वगळता जवळपास सर्वच प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून त्यापैकी ५७ जण सुखरूप आहेत. तर २३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.