भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची जागा बजाज फाऊंडेशन आणि इंटॅक यांच्याकडे देखभालीसाठी दिल्यानंतर त्यांच्याकडून एकामागोमाग एक जागा बळकावण्याचाच प्रयत्न सुरू आ
मुंबई – भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची जागा बजाज फाऊंडेशन आणि इंटॅक यांच्याकडे देखभालीसाठी दिल्यानंतर त्यांच्याकडून एकामागोमाग एक जागा बळकावण्याचाच प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता या संस्थांनी वस्तुसंग्रहालयाबाबत भाडेकरार अजून ३० वर्षाकरता वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मैदानांसह तेथील जागा लाटणा-या या संस्थांना पुन्हा भाडेकरार वाढवून देण्याऐवजी महापालिकेने जानेवारी २००३मध्ये केलेला ठरावच रद्द करावा, अशी मागणी मनसेच्या नगसेविका समिता नाईक यांनी महापौरांकडे केली आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीत पुन्हा पटलावर आणावा, अशी सूचनाही त्यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारित कलादालनाच्या बांधकामात सध्याचे खेळाचेही मैदान जाणार असल्यामुळे स्थानिक रहिवाशी इर्षेला पेटले आहेत. मैदान बचावासाठी स्थानिकांनी आग्रही पाऊल उचलले आहे. त्यामुळे स्थानिकांसोबत मनसेही उभी राहिली आहे. मनसेच्या नगरसेविका नाईक यांनी महापालिकेत आवाज उठवला. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेत प्रतिसाद न मिळाल्यामुळे कायदेशीर मार्गाने त्यांनी आपला लढा सुरू ठेवला आहे. लाड वस्तुसंग्रहालयाच्या वास्तूचे जतन महापालिकेकडून केले जात नसल्यामुळे जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या वतीने राहुल बजाज यांच्याकडून दीड कोटी रुपये घेऊन वस्तुसंग्रहालयाच्या आवारात १५ वर्षाच्या कालावधीकरता ‘विशेष प्रदर्शन गॅलरी’ आणि ‘विशेष मुंबई गॅलरी’ यांची स्थापना करण्यास दिली होती.
या दोन्ही गॅलरींचे नामकरण अनुक्रमे ‘कमलनयन बजाज विशेष प्रदर्शन गॅलरी’ आणि ‘कमलनयन बजाज विशेष मुंबई गॅलरी’ असे करण्यात आले. यामध्ये वस्तुसंग्रहालय व तेथील कलावस्तूंची देखभाल, दर्जा वाढवणे, सुधारणा करणे आणि जिर्णोद्धार करणे आदींचा समावेश होता. त्यामुळे जानेवारी २०१८मध्ये हे भाडेकरार संपुष्टात येणार आहे. मात्र वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारित कलादालनाच्या बांधकाम करण्यात येत असल्यामुळे या संस्थांनी हा भाडेकरार अजून ३० वर्षानी वाढवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
विस्तारित कलादालनात सध्याच्या खेळाच्या मैदानावर कोणतेही बांधकाम केले जाणार नाही, असे आयुक्तांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात यावर बगिचा आणि भुयारी वाहनतळाचा प्रस्ताव आहे. त्यातच या वस्तुसंग्रहालयाची मालकी ही महापालिकेची असल्याचे सांगितले जात आहे. महापालिका आस्थापनावर होणारा खर्च करत असल्यामुळे महापालिकेने हा हा प्रस्ताव पुन्हा पटलावर आणून तो ठरावच रद्द करावा, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. वस्तुसंग्रहालयाच्या बांधकामात कोणत्याही प्रकारे मैदान हातचे जाऊ देणार नसून, यासाठी नव्या विकास आराखडय़ात ‘खेळाचे मैदान’ असे आरक्षण टाकण्यासाठी हरकती व सूचनाद्वारे विकास नियोजन विभागाशी पत्रव्यवहार केला असल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यामुळे महापौर यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.