हिरवेगार डोंगर, द्राक्षांनी फुललेल्या बागा, लज्जतदार पदार्थाचा सुवास, बँडमधून निघालेले मंद सूर आणि सोबत वाइनचा ग्लास.. नाशिकमधील सांजेगाव येथील निसर्गरम्य वातावरण रविवारी ‘वाइन’मय झाले होते.
मुंबई – हिरवेगार डोंगर, द्राक्षांनी फुललेल्या बागा, लज्जतदार पदार्थाचा सुवास, बँडमधून निघालेले मंद सूर आणि सोबत वाइनचा ग्लास.. नाशिकमधील सांजेगाव येथील निसर्गरम्य वातावरण रविवारी ‘वाइन’मय झाले होते. निमित्त होते ‘ग्रोव्हर झॅंम्पा वाइनयार्ड’ या अग्रगण्य वायनरीने आयोजित केलेल्या ‘वाइन महोत्सवा’चे.नाशिक म्हणजे वाइनची राजधानीच. या निसर्गरम्य जिल्ह्यात वाइन उद्योग भरभराटीला आला आहे.
सध्या गुलाबी थंडी पडत असल्याने ‘ग्रोव्हर झॅम्पा वाइनयार्ड’ने अनेक मजेशीर कार्यक्रमांची मेजवानी वाइनप्रेमींना या वाइन महोत्सवातून पेश केली. ग्रेप्स स्टॉम्प (द्राक्ष पायांनी तुडवणे), वाइन टेस्टिंग, वाइन कुकिंग, वाइन पेंटिंग आणि त्याचबरोबर वाइनचा आस्वाद घेऊन धमाकेदार नृत्य, अशा अनेक कार्यक्रमांमुळे या महोत्सवाचे वातावरणात एक वेगळीच नशा आली होती.विविध प्रकारची वाइन आणि याच वाइनचा वापर करून तयार केलेले रूचकर भोजन याचा आस्वाद घेत वाइनप्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
अनेकांनी वाइनच्या सहाय्याने पेटिंगही केले, तर लाइव्ह जॅझ बँडच्या तालावर अनेकांचे पाय थिरकले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका फराह खानसह विविध क्षेत्रांतील अनेकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली होती. वाइनच्या क्षेत्रातील अनेक जाणकार मंडळींनीही यावेळी वाइन विषयावरील विचारांचे आदान-प्रदान केले. वाइनच्या क्षेत्रातील जाणकार आणि प्रेमींसाठी हा एक परिपूर्ण अनुभव होता.
ग्रेप्स स्टॉम्पिंग अर्थात द्राक्ष तुडवणे
द्राक्षांपासून वाइन तयार करण्यासाठी द्राक्षांचा सर्व रस काढणे आवश्यक असते. त्यासाठी ग्रेप्स स्टॉम्पिंग ही पारंपरिक पद्धत वापरली जाते. एका मोठया भांडय़ात द्राक्षाचे घड टाकतात आणि अनेक जण त्यावर नाचून ते पायांनी तुडवतात. ‘ग्रोव्हर झॅम्पा वाइनयार्ड’मध्ये खास वाइनप्रेमींसाठी ग्रेप्स स्टॉम्पिंगचे आयोजन केले होते. मंद संगीत आणि वाइनचा आस्वाद घेत द्राक्षांवर नृत्य करण्याची मजा अनेकांनी लुटली.
सध्या वाइनने भारतीयांमध्ये मोठया प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. वाइनविषयीचे गैरसमज दूर होत असून, सर्वसामान्यही आता वाइनचा स्वीकार करत आहेत. वाइनप्रेमींसाठी आम्ही नेहमीच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करतो आणि त्यांचा वाइन प्राशन करण्याचा अनुभव एका वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवतो.
– रवी जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रोव्हर झॅम्पा.