होळीच्या रंगात बेधुंद होऊन वाहने चालवून वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांविरुध्द मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता.
मुंबई- होळीच्या रंगात बेधुंद होऊन वाहने चालवून वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांविरुध्द मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता.
होळी सणानिमित्त बहुतांश कार्यालयांना सुट्टी असल्याने अतिउत्साहाच्या भरात काही तरुण वाहतुकीचे नियम तोडत असल्याने पोलिसांनी गुरुवार आणि शुक्रवारी मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली.
यामध्ये हेल्मेट, ट्रीपल सीट आणि ड्रंक अँड ड्राईव्ह आणि इतर प्रकरणांत ८ हजार ९८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
होळीच्या सणात नशा करून वाहने चालविणा-यांचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात अधिक वाढ होत असल्याने वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केल्याचे वाहतूक पोलीस अधिका-यांने सांगितले. कुलाबा, बोरिवली, मुलुंड, एअरपोर्ट रोडसह संपूर्ण मुंबईत ही कारवाई करण्यात आली होती.
दुचाकी चालविताना तरुणांकडून अतिउत्साहाच्या भरात हेल्मेट परिधान न करणे, ट्रीपल सीट प्रवास करणे, शिवाय मद्यपान करून वाहन चालविणा-यांवर चौकाचौकात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी ३ ते रात्री २ वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारीही वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरूच ठेवली होती.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये हेल्मेट परिधान न केल्याने १०० रुपये दंड भरावा लागतो. केवळ विनाहेल्मेट वाहन चालविणा-यांकडून १०० रुपये दंडाप्रमाणे पकडण्यात आलेल्या ५ हजार ११४ जणांकडून ५ लाख ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.