मुंबई महापालिका शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना टॅब दिले जाणार असून हे टॅब ‘शाळेतच वापरा आणि शाळेतच ठेवा’,अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.
मुंबई- मुंबई महापालिका शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना टॅब दिले जाणार असून यासाठी तब्बल २२ हजार ७९९ टॅबची खरेदी करण्यात येत आहे. हे टॅब मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाच दिले जाणार असून हे टॅब ‘शाळेतच वापरा आणि शाळेतच ठेवा’,अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे या टॅबमध्ये केवळ पाठय़पुस्तकांच्या मसुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, टॅब शाळेत ठेवल्यास घरी अभ्यास कसा करणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह सर्वांना पडला आहे.
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने खासगी शाळांमधून टॅबचे वाटप केले जात असतानाच महापालिकेच्या शाळांसाठीही टॅब खरेदी करण्यात येत आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात तत्कालीन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घोषणा केल्यानंतर आठवी इयत्तेत शिकणा-या मुलांना टॅब देण्याबाबता प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान अवगत होणे आवश्यक आहे. परंतु महापालिका शाळांमधील विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असल्यामुळे यासाठी आर्थिक भार पेलणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रहार कौल-
[poll id=”1098″]
या शैक्षणिक वर्षात मराठी, उर्दू हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाठय़क्रम असलेले २२ हजार ८९९ टॅब विमा व गॅरेंटीसह विद्यार्थी आणि शिक्षकांना दिले जाणार आहेत. टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून हे टॅब खरेदी केले जाणार असून या शैक्षणिक वर्षात आठवीसाठी आणि पुढील शैक्षणिक वर्षात नववी आणि पुढील शैक्षणिक वर्षात दहावीचे पाठय़क्रम या टॅबमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
चार माध्यमातील विद्यार्थ्यांवर अन्याय
मुंबई महापालिकेच्या वतीने आठ माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. त्यातील गुजराती, तमिळ, तेलगू आणि कन्नड माध्यमातील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब न देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे. हे टॅब शाळेतच वापरून शाळेतच ठेवावे लागणार असल्याने त्यांच्या चार्जिगबाबतीतही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. दरवर्षी प्रत्येक टॅबमध्ये पाठय़क्रमाचा समावेश करण्यासाठी कंपनीच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपये आकारले जाणार आहेत.
शिवसेनेची अर्धी वचनपूर्वी
मुंबई महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. हे टॅबही आता खरेदी करण्यात आलेले आहेत. अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे साहित्य वेळेवर मिळाले नाही, तसेच टॅबही वेळेत मिळणार नाहीत.
आम्ही या वस्तू देतो म्हणून शिवसेना दिंडोरा पिटत आहे, त्या शिवसेनेला विद्यार्थ्यांना वेळेवर वस्तूही देता येत नाहीत. आपल्या वचननाम्यात त्यांनी टॅब देण्याचे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन महापालिकेच्या खर्चाने पूर्ण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला.
आधी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरवा मग मुलांच्या हाती टॅब द्या, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी केली. टॅबला आमचा विरोध नाही, परंतु हे टॅब जर शाळांमध्येच ठेवणार असतील तर मुले अभ्यास कसा करणार, असा सवाल मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
महापालिका शाळांमधील संगणक प्रयोगशाळा, त्यातील संगणक बेंच धुळखात पडले आहेत. व्हर्च्युअल क्लासरूम यशस्वी ठरले नाही, मग टॅब देऊन आपण काय साध्य करत आहात, असा सवाल सपाचे गटनेते रईस शेख यांनी केला आहे.
एका टॅबची किंमत : ६,८५० रुपये
एकूण कंत्राट किंमत : २९.४४ कोटी रुपये
प्रत्येक वर्षी पाठय़क्रमासाठी : १ हजार रुपये