‘वृंदावन नावाच्या मोठया हवेलीत घडणारा हा चित्रपट म्हणजे मराठीतल्या अभिनेत्यांच्या तीन पिढय़ांचा चित्रपट आहे, म्हणून तो सर्वार्थाने भव्य आहे,’ असे अभिनेत्री पूजा सावंत हिने ‘प्रहार’शी बोलताना सांगितले.
मुंबई- ‘वृंदावन नावाच्या मोठया हवेलीत घडणारा हा चित्रपट म्हणजे मराठीतल्या अभिनेत्यांच्या तीन पिढय़ांचा चित्रपट आहे, म्हणून तो सर्वार्थाने भव्य आहे,’ असे अभिनेत्री पूजा सावंत हिने ‘प्रहार’शी बोलताना सांगितले. अशोक सराफ, महेश, मांजरेकर, शरद पोंक्षे सोबत पूजा सावंत, राकेश बापट आणि वैदेही परशुरामी हे तीन तरुण कलाकार या चित्रपटात आहेत.
‘ज्या अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट बघून आम्ही मोठे झालो. त्यांच्यासोबत चित्रपटातील पहिल्या दिवशी चित्रीकरणावेळी माझी जीभ टाळ्याला चिकटली. मला इतका आनंद झाला की मला बोलताच येईना. नायक राकेश बापटने वृंदावनच्या चित्रीकरणाचा अनुभव ‘प्रहार’शी शेअर केला.
गुढीपाडव्याच्या दिवशी ८ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘वंृदावन’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने ‘वृंदावन’ची तरुण सुंदर जोडी पूजा सावंत आणि राकेश बापट यांनी ‘प्रहार’ कार्यालयाला भेट दिली.
या चित्रपटात साहसी दृश्ये, रोमान्स, विनोद असा सर्व मसाला ठासून भरल्याचे सांगून आजवर मराठी चित्रपटात कधीही न वापरल्या गेलेल्या हेलिकॅम, सॅगवे, सेडी कॅम या आधुनिक उपकरणांचा वापर करून अॅक्शन दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. गणेश आचार्य यांनी चित्रपटातील नृत्ये दिग्दर्शित केली आहेत.
या चित्रपटाच्या डॅश गोविंदा.. या गाण्याने चित्रपट येण्यापूर्वीच धूम उडवली आहे. दहीहंडीचे गाणे असले तरी पाण्याचा अपव्यय टाळून केवळ दोन अर्ध्या बादल्या पाण्याचा वापर करून संपूर्ण गाणे जोशपूर्ण नृत्याद्वारे चित्रित केल्याचे राकेश बापट याने सांगितले.
या गाण्यात ८०० कलावंत एकाच वेळी होते आणि तरीही एका दिवसात गाणे चित्रित झाले. आयुषसारख्या महागडया रिसॉर्टमध्ये जिथे आजवर फक्त हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. तिथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.