शक्ती मिल परिसरात छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींवर ठेवण्यात आलेल्या नव्या आरोपांविरोधात बचावपक्ष उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याने या प्रकरणाची सुनावणी बुधवापर्यंत तहकूब करण्यात आली.
मुंबई – शक्ती मिल परिसरात छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींवर ठेवण्यात आलेल्या नव्या आरोपांविरोधात बचावपक्ष उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याने या प्रकरणाची सुनावणी बुधवापर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, आरोपींविरोधात सरकारी पक्षाने दोन नवे पुरावे सादर केले.
या प्रकणातील तीन आरोपींना टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे त्यांच्याविरोधात सुधारित भादंवि कलम ३७६(ई) अंतर्गत आरोप दाखल करण्यासाठी सरकारी पक्षाकडून शुक्रवारी अर्ज करण्यात आला.
त्यानुसार छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी सोमवारी सत्र न्यायालयात कासिम बंगाली, विजय जाधव व मोहम्मद अन्सारी या तीन आरोपींविरोधात नव्याने आरोप ठेवले. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील प्रकाश फालसिंगिकर यांनी ३७६(ई) अंतर्गत ठेवण्यात आलेल्या नव्या आरोपींविरोधात बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती प्रधान न्यायाधीश शालिनी फणसळकर-जोशी यांना दिली.
दरम्यान याप्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे न्यायालयापुढे सादर करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी टेलिफोन ऑपरेटर प्रकरणातील तपास अधिकारी व एका पोलिस अधिका-याची साक्ष न्यायालयापुढे घेतली.