अखेर शाहीद कपूरचं घोडं गंगेत न्हालं म्हणायचं! अहो का काय? शाहीदने गुपचूप का होईना; साखरपुडा उरकल्याची बातमी आहे म्हणून!
बातमी अगदी पक्की आहे. मुलगी दिल्लीस्थित आहे आणि मिरा राजपूत असं तिचं नाव आहे. मागील काही दिवस मिरा मुंबईतच आहे आणि शाहीद तिला फोटोग्राफर्सपासून वाचवत फिरतो आहे.
बॉलिवुड सूत्रांचं तर असं म्हणणं आहे की, शाहीद कपूरचे वडील पंकज कपूर अलीकडेच दिल्लीतील छतरपूर येथील फार्महाउसवर मिराच्या आईवडिलांची भेट घेण्यासाठी गेले होते. पण मिरा आणि शाहीदची भेट घडण्यामागे मात्र एक आध्यात्मिक गुरुजी कारण ठरले असल्याचं बॉलिवुड सूत्रांचं म्हणणं आहे.
त्यानंतर हे दोघं इतके जवळ आले की, मिराच्या मोठय़ा बहिणीला मुलगा झाला तेव्हा शाहीद तिला शुभेच्छा देण्यासाठी थेट तिच्या घरी गेला होता. एकूण काय; शाहीद मिराबाबत खूपच गंभीर आहे आणि त्यामुळेच आपलं लवकर लग्न व्हावं, अशी त्याची इच्छा आहे. पण पत्रकारांपासून शाहीदला आपले संबंध थोडे दूरच ठेवायचे आहेत.
विशेष बाब म्हणजे; ‘कॉफी विथ करण’च्या शेवटच्या पर्वात, शाहीदने आपल्याला अशा मुलीशी लग्न करायला आवडेल, जी चित्रपटसृष्टीशी संबंधित नसेल, असा खुलासा केला होता. म्हणजेच आपलं म्हणणं त्यानं खरं केलं म्हणावं तर..!