मुंबई महापालिकेचा जकात कर रद्द करून जीएसटी आणण्याचा प्रयत्न होत असताना जकातची होणारी चोरी आता उघड होऊ लागली.
मुंबई- मुंबई महापालिकेचा जकात कर रद्द करून जीएसटी आणण्याचा प्रयत्न होत असताना जकातची होणारी चोरी आता उघड होऊ लागली. जकातची ही चोरी सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवकच करत असून काळाचौकी येथील सेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे हेच जकात ऑक्ट्रॉय एजंट असल्याचे समोर आले आहे.
मुलाच्या नावाची ऑक्ट्रॉय एजन्सी काढून त्या पावत्यावर स्वत:चे आणि शिवसेनेचे बोधचिन्ह वापरून ही जकात चोरी केली जात आहे. शिवडी येथे जकात चुकवून आलेला टाईल्स व फोमचा ट्रक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यांनतर हे बिंग फुटले आहे.
मात्र, हा ट्रक पकडल्यामुळे संतप्त झालेल्या रहाटे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांलाच मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांच्याविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दहिसर जकात नाक्यावरून गुजरातवरून एक ट्रक जकात चुकवून मुंबईत आल्याची खबर मिळाल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते गोरख कांगणे यांनी हा ट्रक कॉटन ग्रीन राममंदिराजवळ अडवला. त्यावेळी त्यांच्याकडे जकात भरल्याची पावती मागितली असता जकात कर भरणा-या एजन्सीने दिलेली पावती पुढे केली. या पावतीवर केवळ एक हजार रुपये एवढा कर भरला होता.
प्रत्यक्षात ट्रकमध्ये १०२१ टाईल्सचे बॉक्स व फोम असा १६ टनचा माल होता. या मालाचा जकात हा किमान ७० ते ८० हजार एवढा होतो. परंतु प्रत्यक्षात तो कर फारच कमी भरण्यात आला. मात्र, जकात कर ज्या एजन्सीने भरली होती, त्या पावतीवर ‘श्री रमाकांत रहाटे, राहुल एंटरप्रायझेस अँड राहुल ऑक्ट्रॉय सव्र्हिस (ऑक्ट्रॉय क्लिअरिंग अँड फॉवर्डिग एजंट) असे नाव होते.
मात्र, ही गाडी पकडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत रमाकांत रहाटे यांनी नगरसेवकांना दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून आपल्याला धमकी देऊन ‘तुम्हाला गाडी अडवण्याचा अधिकार कोणी दिला. गाडी त्वरित सोडून दे’असे सांगितले. परंतु याचवेळी मला मारण्याचीही धमकी दिल्यामुळे १०० नंबरवर फोन करून आपण पोलिसांना बोलावले. त्यांनी ही गाडी पोलिसांत नेली आणि त्यांनतर महापालिकेच्या दक्षता विभागाचे अधिकारी येऊन त्यांनीही गाडी ताब्यात घेतली.
तिथून ही गाडी भायखळा येथील बकरी अड्डा येथे ठेवण्यात आल्याचे गोरख कांगणे यांनी सांगितले. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक एजंट बनून जकातीचा पैसा खिशात घालून महापालिकेचा महसूल बुडवत आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी कांगणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्याकडे केली आहे. अशाप्रकारे कुंपणच शेत खात असल्याचे स्पष्ट होत आहे.