पनामा पेपर्समध्ये नाव आलेले चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर टीका केल्यामुळे द इकॉनॉमिस्ट आणि टाईम मासिकाच्या वेबसाईटवर चीनने बंदी घातली आहे.
न्यूयॉर्क- पनामा पेपर्समध्ये नाव आलेले चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर टीका केल्यामुळे द इकॉनॉमिस्ट आणि टाईम मासिकाच्या वेबसाईटवर चीनने बंदी घातली आहे. जिनपिंग यांच्या वाढत्या अधिकाराबद्दल टीकाटिप्पणी केल्याची शिक्षा या परदेशी वृत्त वेबसाईट्सना मिळाली आहे.
द इकॉनॉमिस्टची वेबसाईट आणि जिनपिंग यांच्यावर टीका करणारा लेख संपूर्ण काढून टाकण्यात आला असून २ एप्रिलपासून वेबसाईट बंदच केली आहे.
द इकॉनॉमिस्टच्या मोबाईल अॅपवरही बंदी घातली असून लोकांना लेख डाऊनलोड करून पाहताही येत नाही. व्ही चॅटवरील द इकॉनॉमिस्ट चालवत असलेले अकाऊंट्सही बंद करण्यात आले आहेत.
चिनी राजकारणावरील जिनपिंग यांची पकड दिवसेंदिवस मजबूत होत चालल्याबद्दल दोन्ही मासिकांनी कव्हरस्टोरी केली होती. जिनपिंग यांनी माओवादाचे दिवस परत आणले आहेत, असे त्यांच्या म्हणण्याचा सारांश आहे.
२०१३ मध्ये अध्यक्षपदी आल्यापासून जिनपिंग यांनी चिनी व परदेशी वृत्त वेबसाईट्सविरोधात जोरदार मोहीम उघडली असून भ्रष्टाचाराविरोधात व्यापक मोहीम सुरू केली. त्यात हजारो सरकारी अधिका-यांना अटक केली आहे. माओ त्से तुंगपेक्षाही जास्त अधिकार जिनपिंग यांनी आपल्या हातात एकवटले आहेत, असे द इकॉनॉमिस्टने म्हटले होते.