सिंधुदुर्ग-कुडाळ तालुक्यातलं निरुखे गाव, पणदूर तिठय़ापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं ग्रामदैवत श्री देव रवळनाथ आहे.
सिंधुदुर्ग-कुडाळ तालुक्यातलं निरुखे गाव, पणदूर तिठय़ापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं ग्रामदैवत श्री देव रवळनाथ आहे. कलाकुसरीने सजवलेलं अतिसुंदर, मोहक व रेखीव असं हे मंदिर दिमाखात उभं आहे. हे मंदिर गावाच्या मध्यभागी असून रस्त्याच्या बाजूला आहे. या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नुकताच सात दिवसांचा सप्ताह साजरा झाला. या सप्ताहादरम्यान मंदिरात असलेल्या वीणेक-याने हातातली वीणा खाली न ठेवता गावातल्या प्रत्येक वाडीतल्यांनी चार तास वीणा घेण्याचा नियम घालून दिलेला आहे. याला ‘पारा’ असे संबोधतात.
चौथ्या दिवसापासून आजूबाजूच्या गावातून दिंडय़ा येण्यास सुरुवात होते. सातव्या दिवशी रात्री १० वाजता देव अवसारी काढून देव पालखी सोबत मंदिराभोवती वाजत-गाजत प्रदक्षिणा घातली जाते. रात्रभर भजन, दिंडय़ानी मंदिराचा परिसर गजबजून जातो. दुस-या दिवशी पहाटे देव ग्रामस्थांची गाऱ्हाणी, पडस्थळं झाल्यावर देवाला नदीवर आंघोळीसाठी नेलं जातं. दुपारच्या प्रहरी देवळामध्ये महाप्रसाद असतो. याला ‘समरतना’ म्हणतात. या दिवसात संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते.
या सप्ताहात रात्री मंदिराच्या विभागात अनेक दुकानं थाटली जातात. मालवणी खाजा, खडखडे-चुरमु-याचे लाडू, खेळणी, फुगे, चहा व भज्यांची दुकानाची रेलचेल असते. माहेरवाशिणी देवाची ओटी भरण्याकरता आवर्जून येतात. या काळात थंडीचा अधिक जोर असला तरी ग्रामस्थ येतात.
या सप्ताहानंतर चार दिवसांनी तिथीनुसार दशावतारी नाटक म्हणजे दहिकाला असतो. जत्रेसाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार सकाळी वडेसागोती करून केला जातो. विशेषत: या सप्ताहासाठी दूरवरून चाकरमानी येतात. अलीकडेच या मंदिराच्या परिसराभोवती संरक्षक कठडाही बांधण्यात आला आहे.