डहाणू येथील रिलायन्स औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील राख घेऊन जाणा-या ट्रकचा पाठलाग करणा-या सहा.पोलिस उपनिरिक्षकाला ट्रक चालकाने उडवल्याने त्याचा जागीच मृत्य झाला.
डहाणू- राखेने भरलेल्या ट्रकला हात दाखवूनही तो न थांबल्याने दुचाकीवरून त्याचा फिल्मी स्टाइल पाठलाग करणा-या पोलिसाचा याच ट्रकखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील बाडापोखरण शाळेजवळ घडली.
सुभाष गायकवाड (५६) असे मृत पोलिसाचे नाव असून, ते वाणगाव पोलिस ठाण्यात अंतर्गत आंबा कोस्टल चेक पोस्टवर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करत होते. या घटनेनंतर ट्रकचालक इस्तीयाक शेख (रा. डहाणू पटेलपाडा) हा पसार झाला असून, अपघातात जखमी झालेल्या रत्नाकर पाटील (रा. मुरबे) याच्यावर बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून बाहेर पडणारी राख वाहून नेणारा हा ट्रक बहाड डहाणू खाडीमाग्रे जात होता. त्या वेळी ट्रकला हात दाखवूनही चालकाने गाडी वेगात मारल्याने गायकवाड यांनी संशयातून त्याचा पाठलाग केला.
अंबा चौकीसमोर मित्राची वाट पाहत उभ्या असलेल्या रत्नाकर यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसून गायकवाड यांनी ट्रकचा माग घेतला. पाठलाग करूनही ट्रकचालक थांबत नसल्याने गायकवाड यांनी ट्रकच्या पुढील बाजूकडून मोटारसायकल आडवी घालून ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोटारसायकल ट्रकखाली गेल्याने गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलस्वार रत्नाकर पाटील हा तरुण जबर जखमी झाला आहे.