रेल्वे स्थानकांतील तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी स्मार्टफोनवर पेपरलेस तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मुंबई – रेल्वे स्थानकांतील तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी स्मार्टफोनवर पेपरलेस तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर आता वर्षाअखेपर्यंत सामान्य मोबाईलवरही उपनगरीय रेल्वेचे तिकीट उपलब्ध होणार आहे. या प्रणालीबाबतच सध्या विविध चाचण्या सुरू असून रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर ही प्रणाली कार्यरत करण्यात येईल, असे रेल्वे सूचना प्रणाली केंद्रा(क्रिस)कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई उपनगरातील लोकलच्या तिकिटांकरता प्रवाशांकडून तिकीट खिडकीचा वापर सर्वाधिकम्हणजेच ६० टक्के केला जातो. ही गर्दी कमी करण्यासाठी तिकीट खिडक्यांव्यतिरिक्त एटीव्हीएम मशीन, जनतिकीट विक्री केंद्र, पेपरलेस मोबाईल तिकीट, कॅश कॉइन तिकीट मशीन यांसारखे विविध पर्याय रेल्वेने प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहेत. इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन मोबाईल तिकीट प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गावर या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नाही.
दरम्यान, सध्या मोबाईलवर यूटीएसच्या माध्यमातून पेपरलेस तिकीट घेणा-या प्रवाशांना जीपीएस सर्वरमुळे तिकीट काढण्यात अडचणी येत आहेत. जीपीएस सिग्नलची क्षमता कमी असल्याच्या संदेशामुळे तिकीट काढणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासी अनेकदा नाराजी व्यक्त करत आहेत. या समस्येवर उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू असून जीपीएस सिग्नलमुळे तिकीट काढण्याचा अडथळा कमी होईल असा दावा क्रिसकडून करण्यात येत आहे.