सर्वसामान्यांना परवडणारी घरे, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पोर्ट सिटी प्रोजेक्टचा समावेश असलेला भव्य स्मार्ट सिटी प्रकल्प ‘सिडको’द्वारे प्रथमच राबवण्यात येणार आहे.
मुंबई- सर्वसामान्यांना परवडणारी घरे, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पोर्ट सिटी प्रोजेक्टचा समावेश असलेला भव्य स्मार्ट सिटी प्रकल्प ‘सिडको’द्वारे प्रथमच राबवण्यात येणार आहे.
३४ हजार ७७७ कोटींचा निधी या प्रकल्पावर खर्च होणार असून खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, उलवे, द्रोणागिरी, पुष्पकनगर ही सात शहरे विकसित केली जाणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सांगितले.
बुधवारी दुपारी नरिमन पॉइंट येथील सिडकोच्या कार्यालयात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावर आधारित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ४ डिसेंबर रोजी सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात केला जाणार आहे.
सिडकोने केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या धर्तीवर पालिका क्षेत्र वगळता त्यांच्या अखत्यारित असलेल्या शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवड केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून न राहता सिडको स्वनिधीतून १२ हजार हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा प्रकल्प राबवणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवनवीन संस्थांची निर्मिती केली जाणार असल्याने रोजगार निर्मिती होईल, अशी आशा भाटिया यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या वेगवान प्रवासासाठी नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा-या भूखंडाची आखणी करण्यात आली असून परवडणा-या घरांच्या योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १५ लाखात तर अल्प उत्पन्न गटासाठी २३ लाखात हजारो घरांची निर्मिती केली जाणार आहे.
झोपडपट्टयांचे अतिक्रमण रोखण्यासाठी पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या साहाय्याने विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे. या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने संगणकीय पद्धतीद्वारे अतिक्रमणावर नजर ठेवण्यात येईल.
स्मार्ट सिटीतील योजना
स्मार्ट संस्था, पारदर्शकता, पर्यावरणपूरक योजना, दर्जेदार जीवनशैली, सर्वसमावेशक नियोजन या सुविधांवर २ हजार ३३ कोटी खर्च केले जाणार आहेत. परवडणारी घरे, रस्ते, पाणी, वीज, उद्यान, शाळा, रुग्णालये या पायाभूत सुविधा, मेट्रो-रेल्वे परिवहन सेवा आणि सिडको बंदर शहर निर्मितीवर ३२ हजार ७४४ कोटी खर्च केले जातील.
ग्रीन फिल्ड स्मार्ट सिटी
‘ग्रीन फिल्ड स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत दक्षिण नवीन मुंबईतील नियोजित विमानतळाजवळील पुष्पकनगरचा विकास केला जाईल. २३० हेक्टर क्षेत्रात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून ९४१ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. डिसेंबर २०१८ सालापर्यंत प्रकल्पाची पूर्तता होईल.