सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय आणि जीपीआरएस यंत्रणेने सुसज्ज असलेल्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे.
मुंबई – सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय आणि जीपीआरएस यंत्रणेने सुसज्ज असलेल्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी या बसचे उद्घाटन होणार होते. मात्र, अचानक हा कार्यक्रम रद्द झाला. यामुळे बसचे उद्घाटन पुन्हा कधी होणार, याची माहिती एसटी महामंडळ आणि बसमध्ये ही अत्याधुनिक यंत्रणा बसवणा-या कंपनीलाही नसल्याचे समजते.
महामंडळाच्या ताफ्यात १२५ शिवनेरी व्होल्व्हो बस असून, त्या प्रामुख्याने मुंबई-पुणे दरम्यान धावतात. अलीकडच्या काही दिवसांमध्ये या बसमध्ये चो-या आणि प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याचे प्रकार घडले आहेत. याची दखल घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
त्यानुसार श्री ओम अॅडव्हरटायझर्स यांनी शिवनेरीच्या १०० बसमध्ये सीसीटीव्ही कॅमे-यांबरोबरच वायफाय आणि जीपीआरएस यंत्रणा मोफत बसवली आहे. तीनही प्रकराची यंत्रणा एकाच बसमध्ये उपलब्ध करून देण्याचा एसटी महामंडळाचा हा पहिलाच प्रयत्न आहे, असा दावा केला जात आहे. दरम्यान, ही यंत्रणा बसवलेल्या शिवनेरी बसचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. त्यामुळे आता उद्घाटनाच्या मुहूर्ताची पुन्हा एसटी महामंडळाला वाट पाहवी लागणार आहे.