औषध आणि अन्य सुविधांअभावी चुनाभट्टी (पूर्व) येथील माँसाहेब रुग्णालयात रुग्णांची अक्षरश: हेळसांड होत आहे.
मुंबई- औषध आणि अन्य सुविधांअभावी चुनाभट्टी (पूर्व) येथील माँसाहेब रुग्णालयात रुग्णांची अक्षरश: हेळसांड होत आहे. चुनाभट्टीतील व्ही. एन. मार्गावर पालिकेचे हे तीन मजली रुग्णालय असून, या रुग्णालयात आजूबाजूच्या गरीब वस्तीतील सुमारे ५० हजारहून अधिक गरजू नागरिक उपचारांसाठी येत असतात, मात्र उपचारांअभावी त्यांना आल्या पावली मागे फिरावे लागत आहे.
या रुग्णालयातील दुस-या मजल्यावर प्रसूतिगृह असून, प्रथमोपचार तसेच संसर्गजन्य आजारांवरही येथे उपचार करण्यात येतात. एका वॉर्डात जवळपास १२ खाटा आहेत, मात्र एखादा रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याला डॉक्टर नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांना दुस-या डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यावे लागते. मुळात कमी खर्चात औषध मिळत असल्याने बहुतांश रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात येतात, परंतु अनेकदा अशा रुग्णांना बाहेरून उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. माँसाहेब रुग्णालय हे मुळात प्रसूतिगृह आहे, मात्र तशा स्वरूपाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णालयात एखादी गर्भवती महिला आली व तिचे सिझरिंग करायचे असल्यास सायन रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.
धक्कादायक गोष्ट म्हणजे एखाद्या गर्भवती महिलेला एचआयव्ही असल्याचे सिद्ध झाल्यास तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला जातो. रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांची संख्यासुद्धा हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मुंबईत शिवसेनेची सत्ता असतानाही माँसाहेब या पालिकेच्या रुग्णालयाची झालेली दुरवस्था थांबणार कधी, असा सवाल रुग्णांकडून होत आहे.
माझ्या डाव्या पायाच्या अंगठय़ाचे ऑपरेशन झाले होते, परंतु चुनाभट्टी येथील पालिकेचे रुग्णालय जवळ असल्याने ड्रेसिंग करण्यासाठी गेलो असता तेथे सहा महिन्यांपासून ड्रेसिंगचे मटेरिअल नसल्याचे नर्सने सांगितले. याबाबत मी नगरसेवक विजय तांडेल यांना सांगितले. मात्र त्यांनीही कानाडोळा केला. त्यानंतर हा विषय मी शाखाप्रमुख मानसिंग कापसे यांना सांगितला. त्यावर त्यांनी, आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासमोर वारंवार हा मुद्दा मांडत आहोत, परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. – नंदू घोरपडे, स्थानिक रहिवासी
माँसाहेब या रुग्णालयात महिलांची प्रसूती व्यवस्थित होत आहे. पालिकेचे रुग्णालय असल्याने येथे एनआययूसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथे सिझरिंग होत नाही. त्यामुळे गर्भवती महिलेला सायन रुग्णालयात पाठवण्यात येते. – डॉ. रिना राठोड, डॉक्टर