वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उशिरा घेतलेल्या सभेत श्रीमती तृप्ती सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
मुंबई- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उशिरा घेतलेल्या सभेत श्रीमती तृप्ती सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन केले. वांद्रे शासकीय वसाहतीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर झालेल्या या सभेत मुख्यमंत्र्यांच्या समवेत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत याही उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात भाजपा-शिवसेना सरकारने गेल्या पाच महिन्यात घेतलेल्या विकासाच्या निर्णयांची माहिती सांगून शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करताना पुनर्विकास प्रश्नाचाही उल्लेख केला. या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
‘म्हाडा’मध्ये असलेली प्रकरणे लवकरच निकाली काढणार. सरकारी कर्मचा-यांना घरे देणार, अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या तासगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत जनभावना लक्षात घेऊन त्यांच्या पत्नीविरोधात आम्ही उमेदवार दिला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. आंबेडकर आणि शिवस्मारकाच्या मुद्दयावर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सरकारी योजनांचीच माहिती अधिक दिली. त्यामुळे मुख्यमंत्री प्रचारात आले आहेत, की येथील मतदारांना भाजपाकडे वळविण्यासाठी आले आहेत, अशी कुजबूज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होती.
मुंबई विकासासाठी मुलभूत सोयी महत्त्वाच्या आहेत, मात्र त्या मागील सरकारने केल्या नाहीत अशी टीका करत नगरविकास विभागाकडून निर्णय घेतले जात नसल्याचेही ते म्हणाले. जे निर्णय झाले ते बिल्डरांच्या हिताचे होते, मात्र यापुढे सर्वसामान्य मुंबईकरांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, भाजपाचे आमदार आशिष शेलार, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, ग़ृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, रिपाइंचे अविनाश महातेकर आदी उपस्थित होते.