सीमा शुल्क विभागाचा डोळा चुकवून सोने-चांदीची तस्करी करता यावी, यासाठी आता तस्कर नवनवे फंडे वापरताना दिसत आहेत.
मुंबई – सीमा शुल्क विभागाचा डोळा चुकवून सोने-चांदीची तस्करी करता यावी, यासाठी आता तस्कर नवनवे फंडे वापरताना दिसत आहेत. यात सोन्याच्या दागिन्यांना चांदीचा मुलामा, तर कधी कधी सोन्याच्या तारांना चौकोनी किंवा आयताकृती आकार देऊन ब्रिफकेसच्या पट्टीत लपवून देशात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील काही कारवायांत तस्करांचे असेच काही गोल्डन फंडे समोर आले होते. महिन्याभरापूर्वी सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत सुजल कसारकर, भाविका सुर्ती व जोहल अली इस्माईल हर्नेकर या तीन भारतीय प्रवाशांना ताब्यात घेतले होते. या तिघांनी सोन्याच्या तारा ब्रिफकेसच्या कडेच्या भागात लपवून हा भाग धाग्याने शिवला होता. याशिवाय सोन्याच्या बांगडय़ा व सोनसाखळीला चांदीचा मुलामा देऊन कर चुकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा शुल्क विभागाच्या नजरेतून त्यांच्या या क्लृप्त्या सुटल्या नव्हत्या. त्यांच्याकडून १९७१ ग्रॅम वजनाचे ४९ लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले होते. हे तिघेही दुबई-शारजाहून मुंबईत येत होते.
याआधी मोहम्मद शबाबन मिथाल या प्रवाशालाही ५८० ग्रॅम सोन्यासह (किंमत १४ लाख रुपये) मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्याने ट्रॉली बॅगच्या आतील कडेत सोन्याच्या तारा लपवल्या होत्या. त्याच दिवशी इड्डू कुन्ही नायर या प्रवाशानेही अशाच प्रकारे बॅगेच्या आतील बाजूला सोन्याच्या तारा लपवून आणल्या होत्या. त्याच्याकडूनही सीमा शुल्क विभागाने २४ लाख रुपयांचे सोने हस्तगत केले होते.
तस्करांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी गुप्त माहितीसह एखाद्या प्रवाशाचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबई विमानतळावर येणा-या प्रवाशांच्या रूपरेखेवर आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत. संशयित हालचाल, देहयष्टी, कोणत्या देशातून प्रवासी आला आहे, याकडे विशेष लक्ष देऊन त्या दृष्टीने तपासणीत वाढ केली आहे. त्यामुळे सोन्याच्या तस्करीत अधिकाधिक व्यक्तींना पकडण्यात आम्हाला यश आल्याचे सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी सांगितले.
आयात धोरणाप्रमाणे कायदेशीर आयात केलेल्या कच्च्या सोन्यापैकी २० टक्के सोने पुन्हा निर्यात करणे बंधनकारक आहे. तोवर सोन्याची नवीन आयात करता येत नाही. त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच कर चुकवून भारतात आणलेल्या एक किलो सोने बाजारभावापेक्षा पाच ते सहा लाख रुपये कमी किमतीत पडते. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत सोन्याच्या तस्करीत ३०० पटीने वाढ झाल्याचे उघड झाले. सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ या अवघ्या नऊ महिन्यांत १८२ किलो सोने जप्त केले असून, २०१२-१३ या संपूर्ण वर्षात ५४ किलो सोने जप्त केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. त्यामुळे सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर विशेष मोहिमेंतर्गत गेल्या जानेवारीत ५८ किलो सोने जप्त केले. विशेष म्हणजे या काळात १७०० किलो सोने बेकायदा मुंबईत आणण्यात आल्याचे अधिका-याने स्पष्ट केले.
मुंबई विमानतळावर जप्त केलेले सोने
एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ – ५४ किलो
एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ – १८२ किलो
जानेवारी २०१४ ५८ – किलो