बोरिवली येथे क्षुल्लक वादातून एका महिलेची सोसायटीच्या पदाधिका-याने चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबई- बोरिवली येथे क्षुल्लक वादातून एका महिलेची सोसायटीच्या पदाधिका-याने चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून राजेश रामजीभाई राठोड याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता मेनन आणि राजेश राठोड हे दोघेही बोरिवलीतील एक्सर रोडवरील निलकमल सोसायटीमध्ये राहतात.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात फ्लॅटच्या मालकीवरुन वाद सुरु होता. या दोघांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.
याप्रकरणी त्यांच्यात सोसायटीच्या तिस-या मजल्यावर वाद सुरु झाला होता. प्रकरण वाढत गेले आणि रागाच्या भरात राजेशने घरातील चाकूने विनिता यांच्यावर वार केले होते. या हल्ल्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या.
त्यांना तातडीने जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.