गिरगाव चौपाटीवर पुन्हा एकदा स्टिंग रे माशांने दहशत केली आहे. दीड तासांच्या गणपती विसर्जनाच्यावेळी स्टिंग रे फिश मासे भाविकांना चावले होते.
मुंबई – गिरगाव चौपाटीवर पुन्हा एकदा स्टिंग रे माशांने दहशत केली होती. दीड दीवसाच्या गणपती विसर्जनाच्यावेळी स्टिंग रे फिश मासे भाविकांना चावले होते. अशीच घटना पुन्हा बुधवारी सायंकाळी घडली.
ओहोटी असल्याने समुद्रात गणपती विजर्सनाकरिता गेलेल्या सात भाविकांना मासे चावल्याची घटना घडली. या रुग्णांवर नायर रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर पालिकेच्या कर्मचा-यांना स्टिंग रे मासे आढळून आले होते. त्यानंतर चौपाटीवरील पालिका आणि पोलिस नियंत्रण कक्षातून वारंवार सूचना दिल्या जात होत्या. दीड दिवसांच्या गणपतीच्यावेळी काही भाविकांना मासे चावले होते. त्यानंतर पालिकेने चौपाटीवर मोठे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे समुद्राला ओहोटी असल्याने कित्येक भाविक खोल समुद्रात गणेश मूर्त्यां विसर्जनाकरिता घेऊन जात होते.
सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास भाविकांना मासे चावल्याने त्यांना प्रथम चौपाटीवर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर अधिकतम उपचाराकरिता नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून ५ रुग्णांना सोडण्यात आले. तर दोन रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
भाविकांचा अमाप उत्साह, ढोल ताशांचा निनाद आणि ‘पुढल्या वर्षी लवकर या’ च्या गजरात मुंबईकरांनी बुधवारी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेशगल्लीच्या राजाची मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. गणेशगल्लीच्या राजाच्या दर्शनासाठी मोठया संख्येने भाविक लालबाग परिसरात आले होते. गणेशगल्ली ते लालबाग नाका हे अंतर गाठण्यासाठी सुमारे दोन तास लागले.
मुंबईच्या राजाचा विजय असो’ अशा घोषणांनी लालबाग परिसर चांगलाच दुमदुमला. या परिसरात पोलिसांचा मोठय़ा प्रमाणात फौजफाटा तैनात होता. शीघ्र कृती दल, सीआरपीचे महिला पथक, मुंबई पोलिस असा बंदोबस्त होता. श्रॉफ बिल्डिंगच्या वतीने बाप्पांवर पुष्पवृष्टी केली जाते. यंदाच्या वर्षी खास भारतीय वायू सेनेचे एक लढाऊ विमान तयार केले होते. ते विमान सर्वाच्या आकर्षणाचा विषय ठरला होता.
सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पहिल्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर चौपाटीवर गर्दी वाढू लागली होती. ओहोटी असल्याने सायंकाळी विसर्जनाकरिता आलेल्या उंच गणेश मूर्त्यांचे विसर्जन खोळंबले होते. तसेच अधून मधून तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर हे घिरटया मारत होते.
विशेष म्हणजे यंदाच्या कित्येक मंडळाच्या गणेशमूर्त्यां या सहा वाजण्यापूर्वीच चौपाटीवर विसर्जनाकरिता आल्या होत्या. विसर्जनादरम्यान पोलिसांवर ताण पडतो. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक, काही खासगी सुरक्षारक्षक पुरवणा-या कंपनीचे सुरक्षारक्षक, खासगी रुग्णालयातील सुरक्षारक्षक पोलिसांच्या सोबत रस्त्यावर तैनात होते.
गिरगाव चौपाटीवर आलेले भाविक वाहतुक सुरू असतानाही रस्ता ओलांडतात. त्यामुळे या वेळी खास बांबूचे बॅरिकेटस लावले होते. रस्ता ओलांडणा-या भाविकांवर पोलिस लक्ष ठेऊन होते.
तराफ्यांना थंड प्रतिसाद
गिरगाव चौपाटीवर पालिकेने तराफे ठेवले होते. मात्र ओहोटी असल्याने भाविक हे स्वत:च खोल समुद्रात गणेश मूर्त्यां घेऊन जात होते. या तराफ्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.