घरातली प्रत्येक वस्तू डिझायनर किंवा युनिक असावी असा अट्टहास महिलांचा असतो. मोठय़ा फर्निचरपासून ते अगदी लहान फर्निचरची खरेदी करताना महिला चोखंदळपणाने खरेदी करतात. त्यात हटके फर्निचरची क्रेझ जरा जास्तच वाढतय. गाणी ऐकण्याची आणि चित्रपट बघण्याची आवड असणा-यांकडे सीडीचं चांगलं कलेक्शन असतं, या सीडीजना व्यवस्थित ठेवण्यासाठी हटके सीडी रॅक नकोत का?
काहींना गाण्याची आवड असते तर काहींना फक्त गाणी ऐकण्याची. बरं त्या गाण्यातही काहींना जुनी गाणी ऐकण्याची क्रेझ असते तर काहींना हीपहॉप ऐकायला आवडतं. काहींना चित्रपट बघण्याची इतकी आवड असते की त्यांच्याकडे जुन्या ते आतापर्यंतच्या चित्रपटांच्या अशा नव्या-जुन्या सीडीज असतात. एकंदरीत काय तर या संगीत आणि चित्रपट प्रेमींच्या या सीडीजनासुद्धा घरातला एक कोपरा देणं भाग झालं आहे, म्हणून बाजारात नवनवीन आणि कलात्मक सीडी रॅक आले आहेत. तुमच्या घरातल्या जागेनुसार हे सीडी रॅक बाजारात उपलब्ध आहेत.
ज्यांच्याकडे जागेचा अभाव असेल पण सीडींची संख्या जास्त असेल तर त्यांच्यासाठी भींतीवरतीदेखील लावता येतील असे रॅकही आहेत. तसंच सीडी ठेवण्यासाठी एखाद्या पेटीसारखासुद्धा बॉक्स मिळतो. अगदीच जागेचा अभाव असेल तर फाइल ठेवण्यासाठी जसे फोल्डर्स बाजारात मिळतात त्यासारखेच फोल्डर सीडीसाठीदेखील मिळतात.
ज्यांच्याकडे जागेचा अभाव नाही त्यांच्यासाठी सीडीचे हटके रॅक आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर खास सीडी ठेवण्यासाठी गिटारच्या आकारासारखं कपाटदेखील मिळतं. शंकरपाळी, गोल, चौकोनी, त्रिकोणी अशा वेगवेगळ्या आकारांत हे सीडी रॅक मिळतात.
तुमच्या घराच्या इंटिरीअरला साजेसं असं सीडी रॅक तुम्ही खरेदी करू शकता. हे सगळे सीडी रॅक वॉल माउन्टेड म्हणजेच भिंतीला अडकवणारे असल्यामुळे त्याचा पसारा होत नाही. मेटल, प्लास्टिक आणि लाकडाचे सीडी रॅकदेखील असतात. त्यात मेटलच्या सीडी रॅकची चलती जास्त आहे. कारण ते वजनाला हलके असतात आणि लवकर खराब होत नाही.
ज्यांना बाजारात मिळणा-या सीडी रॅकवर खर्च करायचा नसेल ते आपल्या आवडीनुसार सीडी रॅक बनवून घेऊ शकतात. अगदी साधे आणि कमी खर्चिक असलेले सीडी रॅक तयार करा. घराच्या एखाद्या कोप-यात उभं असलेलं म्हणजेच आयताकृती आकाराचं एखादं कपाट करून घेऊ शकतात. त्या कपाटाला गरजेएवढे खण करून त्यात सीडी ठेवू शकता. जिथे सीडी प्लेयर आहे त्या भिंतीला शिडय़ांच्या आकारात म्हणजे इंग्रजीतल्या ‘एल’ सारखं फर्निचर करून त्यावर सीडी ठेवणं सोप जाईल. तसंच इंग्रजीतल्या ‘डब्ल्यू’ मध्येसुद्धा सीडी रॅक बनवून घेता येईल. हे जास्त खर्चिकसुद्धा नाही. जिथे सीडी किंवा डीव्हीडी प्लेयर ठेवला आहे, त्या ठिकाणीच सीडी रॅक करून घेतलेलं उत्तम जेणेकरून गाणी ऐकायची असतील तेव्हा तुम्ही लगेच सीडी काढून ती ऐकू शकता, शोधण्याची गरज भासणार नाही. सीडी रॅकला एखादं ड्रॉव्हर करून घ्या म्हणेज सीडी व्यतिरिक्त इतर सामानसुद्धा त्यात ठेवता येईल. उदाहरणार्थ डीव्हीडी प्लेयरचा रिमोट आणि हेडफोन तुम्ही त्या ड्रॉव्हरमध्ये ठेवू शकता. बॉक्ससारखं म्हणजे चौकोनी आकाराचं सीडी रॅक करून घेतलं असेल तर त्यावर एखादी आकर्षक शोभेची वस्तू ठेवू शकता.
तुम्हाला सीडी दिसू नयेत असं वाटतं असेल तर वेगवेगळे आकार करताना त्या आकाराचा दरवाजा त्याला करून घेऊ शकता. दरवाजा नको असेल तर त्यावर मण्यांचा पडदा करून तो लावावा. ड्रॉवरप्रमाणे सीडी रॅक करून घेतले तर सीडी दिसणार नाही. पण हे करण्यासाठी पुरेशी जागा असावी लागते. आपल्या आवडीनुसार आणि उपलब्ध जागेनुसार तुम्ही सीडी रॅक तयार करून घेऊ शकता.