लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ सुरू असतानाच आता महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठातील परीक्षांचा सावळागोंधळ समोर आला आहे.
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ सुरू असतानाच आता महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठातील परीक्षांचा सावळागोंधळ समोर आला आहे. बुधवार, २ एप्रिलपासून पदवीच्या चौथ्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र अद्याप विद्यार्थिनींना हॉलतिकीट मिळाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
एसएनडीटी अंतर्गत राज्यात १७६हून अधिक महाविद्यालये आहेत. २ एप्रिलपासून बी. ए.च्या आणि
७ एप्रिलपासून बी. कॉम.च्या चौथ्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र परीक्षेसाठी हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थिनी संभ्रमात पडल्या आहेत. विद्यापीठाकडून ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या तिस-या व पाचव्या सत्राच्या परीक्षेच्या वेळेही असंख्य अनेकांना हॉलतिकीट मिळाले नव्हते.
त्यामुळे गोंधळातच ती परीक्षा झाली होती. विद्यार्थिनींच्या गुणांमध्येही मोठी तफावत आढळून होती. तसेच त्यांच्या महाविद्यालयातील हजेरीतही गोंधळ झाला होता. अनेकांचे तर विषयही बदलले गेले होते. त्यामुळे यंदाच्या परीक्षेतही ऑक्टोबरची पुनर्रावृत्ती होईल की काय, अशी भीती विद्यार्थिनींना वाटत आहे.
फेरतपासणीचा प्रश्न अर्धवट
ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेच्या गुणपत्रिका ठाणे, रायगडसह जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांना शुक्रवारी मिळाल्याची माहिती संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यानी दिली. त्यामुळे या परीक्षेतील अनुत्तीर्ण ठरणा-या विद्यार्थिनींच्या पेपरच्या फेरतपासणीचा प्रश्नही अर्धवटच राहणार आहे. यासाठी विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे आता परीक्षा द्यायची की, मागच्या परीक्षेच्या फेरतपासणीचा अर्ज करायचा, अशा द्विधा मनस्थितीत विद्यार्थिनी आहेत.
२ व ७ एप्रिल रोजी होणा-या परीक्षेसाठी उद्यापासून हॉलतिकीट देण्याची प्रक्रिया सुरू होईल. काही महाविद्यालयांमध्ये हॉलतिकीट देण्यास सुरुवात झाली आहे. ज्या परीक्षा अगोदर सुरू होणार आहेत, त्यांची हॉलतिकिटे अगोदर मिळतील. ऑक्टोबरमध्ये झालेल्या तिस-या व पाचव्या सत्राच्या परीक्षा प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या होत्या. म्हणून चुकीचे हॉलतिकीट जाऊ नये यासाठी यंदा उशीर झाला. मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थिनींना हॉलतिकीट दिले जातील.
– डॉ. पी. एन. मांढरे, परीक्षा नियंत्रक, एसएनडीटी विद्यापीठ