गेल्या दोन महिन्यात अॅक्सिस बँकेतील तब्बल २९ बँक खाती हॅक करण्यात आली असून यातून तब्बल १३ लाख रुपये काढण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई– अत्याधुनिक बँकिंग यंत्रणेचा गैरवापर करून कोटयवधींचा गैरव्यवहार करण्याचे प्रकार दिवसागणीक वाढत आहेत. विशेष म्हणजे सक्षम सुरक्षाव्यवस्थेसाठी नावाजलेल्या जाणा-या मुंबई पोलिसांना याचा फटका बसला आहे.
अॅक्सिस बँकेची ३६ खाती ‘हॅक’ करून त्यांतील १५.१८ लाख रुपये ग्रीसमध्ये काढले गेले. यातील ८ खाती पोलिसांची आहेत. डेबिट कार्ड क्लोनिंगच्या सहाय्याने हॅकर्सनी हे कृत्य केले असून, एप्रिल महिन्यापासून ते अशाप्रकारे चुना लावत असल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी शुक्रवारी सांगितले.
राज्य पोलिसांची अॅक्सिस बँकेत वेतन खाती आहेत. गेल्या काही दिवसांपासून यातील काही खात्यांमधून ग्रीसमधून पैसे काढल्याचे उघड झाले. वरळी, लोअर परेल येथील बीग बाजार व कुलाबा परिसरातील एटीएम वापरलेल्या व्यक्तीच्या खात्यातून रक्कम गेल्याचे उघड झाले. अॅक्सिस बँकेच्या एका एटीएममधून स्किमिंग करून डेबिट कार्ड क्लोनिंग करून पैसे काढले आहेत.
मुंबईच्या परिमंडळ ३चे उपायुक्त विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, यात अॅक्सिस बँकेला तक्रारदार बनवण्यात येणार आहे. पोलिस महासंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. याबाबत शुक्रवारी वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, या गैरव्यवहाराचा फटका कमी ग्राहकांना बसला असून, ही रक्कम परत करण्याचे आश्वासन अॅक्सिस बँकेने दिले आहे.