‘फक्त मराठी’ चित्रपट वाहिनी नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी दर्जेदार मराठी चित्रपटांचा खास नजराणा सादर करते. या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी ‘७०२ दीक्षित’ हा थरारपट आणला आहे. येत्या रविवारी (५ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता पाहता येणार आहे.
‘७०२ दीक्षित’ चित्रपटाची कथा करिअर करणा-या दीक्षित जोडप्याची आहे. काव्या, यश आणि त्यांची मुलगी रेवा यांच्या सुखी कुटुंबात अचानक एक वादळ येतं. त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण आशा या सगळय़ाला कारणीभूत आहे का? असं काय घडतं ज्यामुळे हे सुखी-समाधानी त्रिकोणी कुटुंब उद्ध्वस्त होतं.
यश आणि काव्याचे नातेसंबंध आतल्या-आत धुमसत होते का? या सगळय़ा वरकरणी आलबेल दिसणा-या नातेसंबंधात नेमकं लपलंय तरी काय? काव्याला कसा होणार या गूढ गोष्टींचा उलगडा, हे समजण्यासाठी ‘७०२ दीक्षित’ चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही.
चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह गौरी निगुडकर, पल्लवी पाटील, विजय आंदळकर, जयवंत वाडकर, श्रीरंग देशमुख, रुची जाईल या कलाकारांच्या भूमिका आहेत. उत्कंठावर्धक घटनांचा भावनिक कल्लोळ असणारा कौटुंबिक चित्रपट ‘७०२ दीक्षित’ ‘फक्त मराठी’ चित्रपट वाहिनीवर नक्की पाहा.