भारतीय पर्यटकांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
मुंबई- अमेरिकेला भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामध्ये भारतीय पर्यटकांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
अमेरिकेच्या व्यापार विभागाने सोमवारी हा अहवाल प्रकाशित केला. गतवर्षीच्या तुलनेत कोलंबियातील पर्यटकांची संख्या ५४ टक्क्य़ांनी, तर भारतातील पर्यटकांची संख्या ४२ टक्क्य़ांनी वाढल्याचे यात म्हटले आहे. अमेरिका हे प्रमुख पर्यटन केंद्र असून, २०२० पर्यंत येथील पर्यटकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास अमेरिकेचे व्यापार सचिव पेनी प्रित्झीकेर यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेत येणा-या आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या यादीत भारताचे स्थान पहिल्या दहांत असावे, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने वर्षाला दहा लाख भारतीय पर्यटक आकर्षित करण्याचे लक्ष्य अमेरिकेने ठेवले आहे.
अमेरिकेचे मुंबईतील कौन्सिल जनरल पीटर हास यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या एका वर्षात सुमारे ६ लाख ६० हजार भारतीय पर्यटक अमेरिकेत येतात. हे प्रमाण वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या दृष्टीने काही पावलेही उचलली आहेत.
एकदा अमेरिकेला जाऊन आलेल्या पर्यटकांना पुढच्या वेळी अमेरिकेत जाण्यासाठी मुलाखत देण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा व्हिसाची मुदत संपल्यानंतर ४८ महिन्यांच्या आत पुन्हा व्हिसासाठी अर्ज करणा-यांनाही उपलब्ध असेल.