पाँडिचेरीसारख्या राज्यातही अंगणवाडी सेविकांना १९ हजार रुपये मानधन देण्यात येते.
मुंबई- पाँडिचेरीसारख्या राज्यातही अंगणवाडी सेविकांना १९ हजार रुपये मानधन देण्यात येते. देशातील अनेक राज्यांत दहा हजार रुपयांपेक्षा अधिक माधन देण्यात येत असताना महाराष्ट्रात आठ हजार रुपये मानधन देण्याची दानत न दाखवणारे भाजप सरकार अंगणवाडी सेविकांचा संप चिरडण्याचे उद्योग करत आहे. याच्या निषेधार्थ अंगणवाडीदिनी हजारो ग्रामसभांमध्ये सरकारच्या निषेधाचे व संपाला पाठिंबा देणारे ठराव
करण्यात आले.
शिवसेनेबरोबर आता काँग्रेसनेही अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाला पाठिंबा दिला असून सरकार केवळ आर्थिकदृष्टाच नव्हे तर बौद्धिकदृष्टय़ाही दिवाळखोर असल्याची टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ११ सप्टेंबरपासून राज्यातील ९७ हजार अंगणवाडय़ांमध्ये काम करणा-या दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचा-यांनी मानधनवाढीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. सरकार ठोस तोडगा काढण्यास टाळाटाळ करत असून जिल्हाधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या अधिका-यांच्या माध्यमातून दडपशाही करत असल्यामुळे आज हजारो ग्रामसभांमध्ये आम्ही संपाला पाठिंबा आणि भाजप सरकारच्या निषेधाचा ठराव केल्याचे अंगणवाडी कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी सांगितले.
वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शन करण्यासाठी शेकडो महिला गेल्या होत्या. तथापि मुख्यमंत्री तुमच्याशी चर्चा करतील असे सांगून पोलिसांनी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे व आशा कार्यकर्त्यांंच्या जिल्हा प्रमुख संध्या म्हैसकर यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. मुख्यमंत्री वर्धा येथून हेलिकॉप्टरने जात असताना या पदाधिका-यांना तेथे नेण्यात आले मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेटही घेतली नाही अखेर तेथे उपस्थित असलेल्या खासदारांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे कृती समितीचे एम.ए. पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी आम्ही वर्धा येथे सत्तरहून अधिक आरोग्य कार्यक्रम राबवले होते. मात्र आज तेच मुख्यमंत्री आमचे निवेदनही घ्यायला तयार नाहीत ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे संध्या म्हैसकर यांनी सांगितले. हे सरकार नतद्रष्ट असून आठ हजार रुपये मानधन देण्याचीही त्यांना दानत नसावी, हे चीड आणणारे असल्याचे विखे-पाटील म्हणाले.
[EPSB]
माणूस हा इथून तिथून सारखा असला तरी त्याचे वर्तन माणसा-माणसातला फरक स्पष्ट करते.
[/EPSB]