माझ्या सगळय़ा बहिणी, माझी लेक नियमी पुण्यात तर मुलगा चिदघन दिल्लीत.. मी इथे नोकरीनिमित्ताने मुंबईत.. मला दरवर्षीच बहिणींकडून औक्षण करून घ्यायला मिळत नाही, ही एक खंत असतेच.. मी माझ्या सख्ख्या, चुलत सर्व बहिणींची भाऊबीज भेट आधीच पाठवून देतो.. मात्र बहिणींकडून ओवाळून घेता येत नाही, याची सल मनात राहतेच.. त्यांचे औक्षण, त्यातली आपुलकी मी दरवर्षीच मिस करतो..
माझ्या पत्रकारितेच्या ४५ वर्षाच्या कालावधीतली बहुतांश दिवाळी ही ऑफिसातच साजरी झाली आहे. पत्रकारितेमुळे घरच्यांना वेळ देता येत नाही, ही नेहमीचीच तक्रार ऐन दिवाळीतही ऐकून घ्यावी लागतेच.. तरीही आपल्यासोबतीनेच वरिष्ठ, कनिष्ठ सर्वच सहका-यांचा विचार करून दिवाळीच्या रजा-सुट्टय़ांचे नियोजन करावे लागते, सर्वानाच आपापल्या कुटुंबासोबत किमान एक दिवसाची हक्काची सुट्टी व्यतित करता यावी, इतके भान मी पाळले आहे..
होतं काय की, दिवाळी म्हणजे वाचकांकरिता नवे काहीतरी वाचायला मिळावे, या अपेक्षांचा हा काळ.. त्यामुळे दिवाळी अंकाच्या विषयापासून लेखक मंडळी निवडण्यापर्यंत ते अंक छपाईला जाईपर्यंत अनंत कसरती कराव्या लागतात. पुन्हा दिवाळीच्या चार दिवसांत वेगळे काय विषय द्यायचे याचेही प्लॅन करावे लागतात.. त्यामुळे दरवर्षीची अर्धी दिवाळी कार्यालयीन कामकाजातच सरते. लक्ष्मीपूजनालाही वेळेत पोहोचण्याची लगबग राहतेच. या सर्व कसरतीत कायमच वाचकांना वेगळे काय देऊ शकतो, त्यांच्या अभिरुचीला कसा न्याय देऊ शकतो, याचे आव्हान असतेच..
माझ्या सगळय़ा बहिणी, माझी लेक नियमी पुण्यात तर मुलगा चिदघन दिल्लीत, मी इथे नोकरीनिमित्ताने मुंबईत.. मला दरवर्षीच बहिणींकडून औक्षण करून घ्यायला मिळत नाही, ही एक खंत असतेच.. मी आठवणीने माझ्या सख्ख्या, चुलत सर्व बहिणींची भाऊबीज भेट आधीच पाठवून देतो.. मात्र बहिणींकडून ओवाळून घेता येत नाही, याची सल मनात राहतेच..
हल्ली फटाक्यांची इतकी आवड राहिली नाही, मोबाईल, टॅब अन् व्हीडिओमध्ये रमलेल्या मुलांना तर फटाक्यांचा फारसा ओढा नाहीच, शिवाय त्यांना काय गिफ्ट द्यायची हा एक मोठा प्रश्नच होऊन बसला आहे. माझ्या लाडक्या नातीला अनिकालाही गिफ्ट खरेदी करताना मला प्रश्न पडतोच.. मी शक्यतो दिवाळीच्या कालावधीत पर्यटनाला जात नाही, कारण बाहेर प्रचंड गर्दी, आरक्षणाचे प्रॉब्लेम, अनेकदा बुकिंग केलेले हॉटेलही असुविधा आणि तांत्रिक कारणाने रद्द करावे लागते.
दिवाळीतला लक्ष्मीपूजनाइतकाच पाडवा मला विशेष भावतो.. दरवर्षी मेघनाकरिता, माझ्या धर्मपत्नीकरिता एक विशेष गिफ्ट मी हमखास घेतोच.. ती एअर इंडियात नोकरी करते. मात्र पत्रकारांसारखे अनिश्चित टाईम टेबल नसते. तरीही माझ्या कामाला तिने समरसून साथ दिली आहे.. खरे तर पाडवा हे अशा नात्यांना संवेदनशीलतेने जपण्याचा एक बहाणा देते, असे मला वाटते. आयुष्यात आपल्यासोबत असणा-या या नात्यांमुळेच तर आपण अनेक अडचणी, आव्हांनावर मात करू शकतो..
हल्ली साजरी होणा-या दिवाळीबाबत, माझे निरीक्षण असे की, मोबाईल संस्कृतीमुळे प्रत्येकजण संकुचित झाला आहे. आपलेपणाने, प्रेमाने एकमेकांना शुभेच्छा देतानाही त्यात औपचारिकता कधी आली ते कळत नाही, गत १०-१५ वर्षातला झपाटय़ाने झालेला हा बदल आहे. आम्ही पत्रकार पूर्वी वर्षभरात संपर्कात आलेले अनेक परिचित, राजकारणी यांच्यापर्यंत दिवाळीनिमित्त पोहोचायचो, अगदी राजकारणी नेतेमंडळी आणि पत्रकार यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळय़ाचे नाते होते. आता त्यात एक प्रकारची औपचारिकता आली आहे. दिवाळीतला माझा आणखी एक महत्त्वाचा आनंद म्हणजे दिवाळी अंक. चिंतनसारखे अनेक दिवाळी अंक एका विशिष्ट विषयाला वाहिलेले असतात, त्यातून अनेक स्थित्यंतरे कळतात. दिवाळीनंतर साधारण सर्वच वर्तमानपत्रात दिवाळी अंकाची परीक्षणे प्रसिद्ध होतात, मी ती आवर्जून वाचतो. त्यावरून अंक निवडतो अन् वाचतोही.
[EPSB]
[/EPSB]